संभाव्य निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेची यंत्रणा सतर्क – ठाणेकरानी खबरदारी बाळगण्याचे महापौर, महापालिका आयुक्तांचे आवाहन

पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ठाणेकरांनी आवश्यक ती खबरदारी बाळगावी असे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उद्या पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता असून या कालावधीमध्ये वेगवान वारे वाहण्याची आणि जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. ही परिस्थिती लक्षात घेवून ठाणे महापालिकेचा प्रादेशीक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि विभागवार प्रभाग समिती नियंत्रण कक्ष पुरेशा मनुष्यबळासह सज्ज ठेवण्यात आले आहेत. ठाणे अग्निशमन दल यांच्यासह राज्य आपत्ती निवारण दल आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाची पथकं सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. दरम्यान सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीतंर्गत संभाव्य धोका पोहोचू शकणाऱ्या वसाहती तसेच सखल भागातील वसाहती निश्चित करून तेथील नागरिकांना जवळपासच्या शाळांमध्ये अथवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. मच्छीमार आणि इतरांनीही खाडीकिनारपट्टीवर जाऊ नये, खाडी किनाऱ्यापासून लांब रहावे, झाडं आणि खांबाखाली नागरिकांनी उभे राहू नये, वादळाच्या कालावधीमध्ये घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading