सोसायट्यांमधील क्लब हाऊस, हॉल कोव्हीड केअर सेंटर म्हणून घोषित करण्याचा पालिका आयुक्तांचा निर्णय

कोव्हीड 19 ची सौम्य लक्षणे असलेल्या आणि कसलाही त्रास नसलेल्या रूग्णांना आता सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये क्वारंटाईन करण्याचा आणि त्यासाठी सोसायट्यांमधील क्लब हाऊसेस कोव्हीड केअर सेंटर म्हणून घोषित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून ज्यांना सौम्य लक्षणे आहेत अशा रूग्णांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेने हे आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. एखाद्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये कोरोना बाधित रूग्ण सापडल्यास आणि त्यांना सौम्य लक्षणे असतील तर अशा रुग्णांसाठी गृहनिर्माण संस्थांमधील क्लब हाऊस किंवा मल्टीपर्पज हॉल हे आता कोव्हीड केअर सेंटर म्हणून घोषित करण्यात आले असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे. तसा आदेश पारित करण्यात आला असून त्यानुसार या आदेशाची प्रत मिळाल्यापासून पुढील तीन दिवसात क्लब हाऊस आणि मल्टीपर्पज हॉल यासाठी आरक्षित करावेत असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे. ज्या गरजू रुग्णांना खरोखरच रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. रुग्णालय उपलब्ध व्हावे म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार आता सोसायटीमधील क्लब हाऊस किंवा मल्टीपर्पज हॉल हे आता कोव्हीड केअर सेंटर म्हणून घोषित करण्यात आल्याचे आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले. त्यानुसार हे परिपत्रक प्राप्त झाल्यापासून पुढील तीन दिवसात गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी महापालिकेच्या coronacelltmc@gmail.com या मेल आयडीवर मेलद्वारे कोव्हीड केअर सेंटरची नोंदणी केल्यावर या क्लब हाऊसमध्ये संबंधित सोसायटीमधील कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या सदस्यांचं अलगीकरण करता येणार आहे. या निर्णयानुसार सोसायटीबाहेरील सदस्यांना त्यांच्या सोसायटी बाहेरील नातेवाईकांना सोसायटीच्या क्वॉरन्टाइन सेंटरमध्ये आणता येणार नाही, सोसायटीच्या क्वॉरन्टाइन सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सदस्यांची मागणी निर्माण झाल्यास प्रथम आलेल्या सदस्याला क्वॉरन्टाइन करणे हे नियमानुसार असेल. या सेंटरमध्ये अलगीकरण केलेल्या सदस्यांस त्यांच्या कुटुंबाकडून चहा, पाणी, नास्ता, भोजन आदी पुरविण्यात येईल. कुटुंबातील सदस्यांनी क्वॉरन्टाइन सेंटरमध्ये ठराविक लांब अंतरावर खाद्यपदार्थ ठेवावे आणि क्वॉरन्टाइन झालेल्या सदस्याने ते स्वत: घेऊन जाणे आवश्यक राहिल. रुग्णास खाद्य पदार्थ देताना नॉन रियुजेबल साहित्याचा वापर करणे बंधनकारक असणार आहे, संबधित क्वॉरन्टाइन सेंटरची साफसफाई रुग्णांना स्वत: करावी लागेल किंवा पीपीई कीट परिधान केलेल्या प्रशिक्षित कर्मचाऱ्याकडून अशी साफसफाई करुन घेता येईल. क्वॉरन्टाईन सेंटरमधून निघणारा कचरा हा बायो मेडिकल वेस्टला देणे बंधनकारक राहिल, सबंधित सोसायटीमध्ये वास्तव्यास असलेले डॉक्टर्स अशा रुग्णांची देखभाल करतील परंतु सोसायटीमध्ये वास्तव्याला डॉक्टर्स नसल्यास महापालिकेकडून वैद्यकीय अधिकारी प्राप्त करुन घेणे सोसायटीला बंधनकारक राहिल. सोसायटीमध्ये क्लारंटाईन करण्यात आलेल्या रूग्णांची देखरेख करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या डॉक्टर्सचे मानधन देण्याची जबाबदारी संबधित रुग्ण किंवा त्याच्या कुटुंबाची किंवा सोसायटीची असेल. संबधित क्लब हाऊसमध्ये जम्बो ऑक्सीजन सिलेंडर आणि ऑक्सीजन पुरविणारी मास्क ठेवणे संबधित सोसायटीला बंधनकारक राहील, जम्बो ऑक्सीजन सिलेंडर प्राप्त करुन घेण्यासाठी तांत्रिक साहाय्य सोसायटीमधील उपलब्ध डॉक्टरांनी द्यायचे आहे किंवा जर ते उपलब्ध नसेल तर आणि तांत्रिक साहाय्य आवश्यक असल्यास ते ठाणे महापालिकेकडून उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या सर्व अटी-शर्ती मान्य असल्याचं आणि कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्याबाबतचे लेखी सहमतीचे पत्र गृहनिर्माण संस्थेने परिपत्रक प्राप्त झाल्यापासून 3 दिवसाच्या आत ठाणे महापालिकेला लेखी कळवावे असेही महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading