श्रेयवादाच्या लढाईत अडकले घोडबंदर रोडचे वाढीव पाणी

घोडबंदर रोडसह ब्रह्रांड-पातलीपाडा भागातील तीव्र पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांना शिवसेनेकडून आव्हान दिले जात आहे. वाढीव पाण्याचे श्रेय आपल्याला घेण्यासाठी शिवसेनेचीही शिष्टमंडळे महापालिकेत धडकली असली तरी महापौर नरेश म्हस्के यांच्या खणखणीत इशाऱ्यानंतर घोडबंदर रोड परिसराला अद्याप वाढीव पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. सध्या पाणीटंचाईचे चटके कायम असून, श्रेयवादाच्या लढाईत घोडबंदर रोडवरील पाणी अडकल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू झाली आहे. या प्रकाराबद्दल नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घोडबंदर रोड परिसरातील तीव्र पाणीटंचाईविरोधात ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी सर्वप्रथम आवाज उठविला. त्यानंतर या संदर्भात ५ ऑक्टोबर रोजी आयुक्तांच्या दालनात बैठकही झाली होती. त्यात घोडबंदरवासियांसाठी वाढीव १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याचे आयुक्तांनी निर्देश दिले होते. मात्र, त्याबाबत कार्यवाही झाली नव्हती. या संदर्भात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महापौरांनी बैठक घेऊन वाढीव पाणीपुरवठ्याचे निर्देश दिले. मात्र, दुसऱ्या दिवशी शिवसेनेमुळेच पाणीप्रश्न सुटल्याचा दावा केला होता. आपण एकाच बैठकीत हा निर्णय धसास लावल्याचा दावा त्यांनी केला. वाढीव पाणीपुरवठ्याचे श्रेय शिवसेनेला घेण्याचा महापौरांचा प्रयत्न होता. त्यावर डुंबरे यांनी शरसंधान करून दोन वर्ष पाण्यासाठी ठणाणा सुरू असताना शिवसेना झोपली होती का असा प्रश्न केला होता. या बैठकीला आणि महापौरांच्या खणखणीत इशाऱ्याला साधारण तीन आठवडे उलटल्यानंतरही, घोडबंदर रोडवरील पाणीटंचाई कायम आहे. शिवसेना विभागप्रमुखांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांच्या शिष्टमंडळाने नुकतीच महापौरांची भेट घेऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सोशल मिडियावर ब्रह्रांडमधील पाणीटंचाई लवकरच दूर होणार असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर आता भाजपाला श्रेय मिळू नये, यासाठी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारीही उतरल्याचे स्पष्ट होत आहे. तब्बल दोन वर्षांपासून घोडबंदर परिसरासह ब्रह्रांड भागाला पाणीटंचाईचा फटका बसत आहे. मात्र, तो अद्याप दूर झालेला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून भाजपा-शिवसेनेकडून वाढीव पाण्याचे दावे केले गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महापौरांनी आता पाणीप्रश्न सोडविल्याचाच दावा केला. मात्र, अजूनही घोडबंदरवासियांची फरफट टळलेली नाही. भाजपा-शिवसेनेच्या श्रेयवादाच्या लढाईत तर घोडबंदर रोडचे पाणी अडकले नाही ना, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. त्याचबरोबर संतापही व्यक्त केला जात आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading