शेअर रिक्षातून प्रवास करणा-या प्रवाशांना लुटणा-या टोळीला जेरबंद करण्यात नौपाडा पोलीसांना यश

रिक्षामधून जाणा-या प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाईल फोन जबरीने चोरून नेणा-या दोघांना नौपाडा पोलीसांनी अटक केली आहे. शेअर रिक्षामधून प्रवाशाला लुटणा-या या टोळीमध्ये तिघांचा समावेश होता. एक बुरखाधारी महिला आणि दोन व्यक्ती हे लुटमारीचं काम करत होते. विक्रोळीत राहणारे सचिन तांबे हे व्यावसायिक विक्रोळीला जाण्यासाठी म्हणून कॅडबरी नाक्यावर उभे होते. त्यावेळी एक रिक्षावाला मुंबई मुंबई म्हणत पुढे आला. त्यावेळी सचिन तांबे यांना विक्रोळीला जायचं असल्यामुळं त्यांनी रिक्षाला हात दाखवून रिक्षा थांबवली. पण या रिक्षात आधीच एक व्यक्ती आणि बुरखाधारी महिला बसली होती. तांबे हे एखादं कुटुंबं असेल असं समजून रिक्षात बसले. तीन हात नाक्याच्या पुढे गेल्यावर रिक्षात बसलेल्या व्यक्तीनं त्यांना चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ केली आणि त्यांच्याकडील वस्तू काढून घ्यायला सुरूवात केली. मोबाईल, गॉगल, चारशे ते पाचशे रूपयांची रोकड काढून घेतल्यावर पुन्हा त्यांना कोरम मॉलसमोर आणून जबरदस्तीनं उतरवलं. याप्रकरणी तांबे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नौपाडा पोलीसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मुंब्र्यातील परवेझ उर्फ फिरोज खान आणि इम्तियाज काद्री अशा दोघांना अटक केली. या दोघांबरोबर असलेली महिला अद्याप मिळालेली नाही. या दोघांच्या नावावर अनेक गुन्हे असून पोलीसांनी त्यांच्याकडून ३ लाख १९ हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. असे गुन्हे घडू नयेत म्हणून पोलीसांनी विशेष तपासणी मोहिम सुरू केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading