निविदा प्रक्रिया न राबवता कंत्राटदारांना कामं देऊन जनतेचे कोट्यावधी रूपये वाया घालवणारी ठाणे महापालिका ही राज्यातली पहिली महापालिका – निरंजन डावखरे

निविदा प्रक्रिया न राबवता कंत्राटदारांना कामं देऊन जनतेचे कोट्यावधी रूपये वाया घालवणारी ठाणे महापालिका ही राज्यातली पहिली महापालिका आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. आपला दवाखाना प्रकल्पावरून महापालिका प्रशासनाची बेफिकीरी उघड झाली असून ठाणेकरांच्या पैशांची सत्ताधा-यांकडून बेसुमार उधळपट्टी होत असल्याचं डावखरे यांनी म्हटलं आहे. दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर आपला दवाखाना प्रकल्प सुरू झाला. एकीकडे महापालिकेनं ३७ वर्षात केवळ २८ आरोग्य केंद्र उभारली. ४ लाख लोकसंख्या असलेल्या दिव्यामध्ये तर आरोग्य केंद्रही नाही. त्यात सुविधांची वानवा असताना आपला दवाखानाद्वारे ५० दवाखाने कंत्राटदारामार्फत उघडून कंत्राटदाराला १६० कोटी रूपये दिले जाणार आहेत. आता तर निविदा प्रक्रियेत नसलेल्या कंपनीलाच कार्यादेश देण्याचा उद्योग प्रशासनानं केला आहे. याप्रकरणी निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्तांकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे. आपला दवाखाना प्रकल्पाच्या कार्यादेशावरून उघड झालेला घोळ हे हिमनगाचं टोक आहे. महापालिकेत अनेक गैरप्रकार घडल्याची दाट शक्यता असून गेल्या पाच वर्षातील मंजूर केलेल्या निविदा, करार, स्मार्ट सिटीतील कामं यांची चौकशी करावी आणि यातून सामान्य करदात्याचा काय फायदा झाला हे जाहीर करावं अशी मागणी निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading