शिवाईनगर येथे खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंडावर दफनविधी करण्यात आला असून ८ दिवसात भूखंड परत न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा

शिवाईनगर येथे खेळाच्या मैदानासाठी आरक्षित करण्यात आलेल्या भूखंडावर दफनविधी करण्यात आला असून येत्या ८ दिवसात हा भूखंड परत न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा जितेंद्रकुमार इंदिसे यांनी दिला आहे. शिवाईनगर येथे सर्वे क्रमांक १८९/२/अ हा साडेपाच एकराचा भूखंड आहे. या भूखंडाचा सुमारे सव्वा सहा लाख चौरस फूटाचा टीडीआर एका बड्या बांधकाम व्यावसायिकानं वापरला आहे. त्या बदल्यात खेळाचं मैदान विकसित करून देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. ठाणे महापालिकेनं यासाठी या बांधकाम व्यावसायिकावर दबाव टाकला नाही तसंच भूखंडही ताब्यात घेतला नाही याचा फायदा घेऊन या परिसरातील एका चर्च व्यवस्थापनानं या भूखंडावर एका मृत व्यक्तीचं दफन केलं आहे. यावेळी अनेकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला पण या विरोधास जुमानण्यात आलं नाही. या परिसरात साई आनंद सोसायटी, जानकीदेवी झोपडपट्टी, लिटिल फ्लॉवर शाळा, लक्ष्मीनारायण सोसायटी, रवि इस्टेट अशी नागरी वस्ती आहे. वस्तीमध्ये स्मशान असू नये अशी साधी अपेक्षा असते. पण पालिका अधिका-यांमुळेच ही वेळ आली असल्यानं येत्या ८ दिवसात हा भूखंड ताब्यात न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा जितेंद्रकुमार इंदिसेंनी दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading