ठाणे महापालिकेच्या बाहेर असलेल्या शिवशिल्प दुरूस्तीवरून महापौर दालनात मराठा मोर्चाचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांच्यात जोरदार वादावादी झाली. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर असणा-या शिवशिल्पाची दुरावस्था झाली आहे. याची दुरूस्ती व्हावी अशी मराठा मोर्चाची मागणी असून त्यासाठी ३ वर्ष पाठपुरावा केला जात होता. पण तरीही दुरूस्ती होत नसल्यामुळं मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी महापौरांना निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. निवेदन देण्याच्या वेळी क्षुल्लक कारणावरून वादावादी सुरू झाली आणि ती वाढतच गेली. शिवशिल्प दुरूस्तीसाठी महापालिकेला पैसे देण्याकरिता म्हणून १० लाखांचा धनादेश पदाधिका-यांनी आणला होता. पण नरेश म्हस्के, महापौर आणि पदाधिका-यांमध्ये हमरीतुमरी झाली. या वादात म्हस्के यांनी कैलास म्हापदी यांची कॉलर धरण्यापर्यंत वाद गेला. त्यावरून म्हापदी यांनी निवेदन आणि धनादेश फाडून टाकला. हिंमत असेल तर आयुक्तांना जाऊन विचारा असा टोला म्हस्के यांनी यावेळी पदाधिका-यांना लगावला. त्यानंतर हे सर्व पदाधिकारी आयुक्तांकडे गेले. आयुक्तांनी शिवशिल्पाच्या दुरूस्तीसाठी १० लाखांचा निधी देऊन तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले. या वादानंतर मराठा समाजाची ताकद दाखवून देऊ असा इशारा कैलास म्हापदी यांनी दिला.