शिधावाटप कार्यालयाची वाटचाल आयएसो मानांकनाच्या वाटचाल

गेली अनेक वर्षे पडझड झालेल्या चाळवजा वास्तूत हजारो सर्वसामान्य नागरिकांना सेवा देणारे शिधावाटप कार्यालय आयएसओ मानांकनाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला कामाला लावल्याने जीर्ण-पडके कार्यालय आता झळाळून निघाले आहे.
गेली अनेक वर्षे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये चाळवजा वास्तूतील शिधावाटप कार्यालय अनेक सोयी-सुविधांपासून वंचित होते. गळके छप्पर, माती गळत असलेल्या भिंती, कोंदट वातावरण आदी समस्यांनी हे कार्यालय, या कार्यालयातील कर्मचारी आणि येथे रोज दैनंदिन कामासाठी येणारे शेकडो शिधापत्रिका धारक त्रस्त होते. या वास्तूच्या दुरुस्तीबाबत पीडब्ल्यूडी विभागही पुढे येत नव्हते, त्यामुळे येथील कार्यक्षमतेवर आणि पर्यायाने नागरिकांच्या सेवेवरही परिणाम होत होता. आमदार संजय केळकर यांनी या कार्यालयातील समस्यांची आणि गरजांची माहिती घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आयएसओ मानांकनाच्या दृष्टीने संपूर्ण दुरुस्तीचा आराखडा तयार करण्यात आला. या कार्यालयातील भिंतींचे नव्याने प्लास्टर करून रंगरंगोटी करण्यात आली आहे. नवे छप्पर बसवण्यात आले आहे. भिंतींना टाईल्स बसवण्यात आल्या आहेत. नवीन विजेची उपकरणे बसवून नव्याने वायरिंग करण्यात आली आहे. खाली लाद्या बसवून त्यावर कार्पेट अंथरण्यात आले आहे. शौचालये, स्वच्छता कक्ष तयार करण्यात आले आहेत. संपूर्ण कार्यालयाचे पेस्ट कंट्रोल करण्यात आले आहे. ट्रेझरी विभागाची जुनी तिजोरी त्या विभागाने हटवून नष्ट केली आहे. नवीन फलक आणि अभिलेख भिंतींवर लावण्यात आले आहेत. शॉर्ट सर्किट होऊन धूर येऊ लागल्यास त्याची तत्काळ माहिती मिळून उपाय योजना करता यावी म्हणून स्मोक डिटेक्टर आणि अग्निशामक नळकांडे बसवण्यात आले आहे. आमदार केळकर यांनी संगणकही उपलब्ध करून दिले आहेत. या कार्यालयात शिधापत्रिकेबाबत कामे करण्यासाठी रोज शेकडो नागरिक येत असतात. त्यांना बसण्यासाठी आसनव्यवस्थाही करण्यात आली आहे. काही महिलाही त्यांच्या लहान मुलांना घेऊन येत असतात. त्यांची अडचण होऊ नये म्हणून स्वतंत्र हिरकणी कक्षही तयार करण्यात आला आहे. याबाबत शिधावाटप निरीक्षक एस.आर.चव्हाण म्हणाल्या, इतिहासात प्रथमच शिधावाटप कार्यालय सुशोभित आणि सर्व सुविधायुक्त झाले आहे. हा बदल लोकाभिमुख असून नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतल्यानेच हे शक्य झाले असून हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आयएसओ मानांकनाच्या दृष्टीने सर्व बदल करण्यात आले आहेत. पारदर्शी आणि संपूर्ण संगणकीकृत कारभार सुरू केला आहे. शिधापत्रिका संदर्भात विविध कामांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जनजागृतीसह विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading