महापालिका शाळेत शाडू माती पासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्ष, शिक्षण विभाग आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका शाळा तसेच इतर शाळांमध्ये शाडू माती पासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा झाली. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यशाळा ठाणे महानगरपालिकेच्या सहा शाळांमध्ये घेण्यात आल्या. त्यात एकूण 218 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तसेच पालिकेच्या विविध भागातील इतर शाळांनीही या कार्यशाळेत सहभाग नोंदविला. त्यात इतर पाच 5 शाळेतील 190 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यासोबतच पर्यावरण आपुलकी जपणाऱ्या सामान्य नागरिकांसाठीही दोन ठिकाणी ही कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यापैकी श्रीराम व्यायामशाळा, ठाण्यातील कार्यशाळेत 21 सभासदांनी भाग घेतला, तर पर्यावरण शाळा येथील कार्यशाळेत 10 सभासदांनी भाग घेतला. आजपर्यंत एकूण 13 कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, शिक्षकेत्तर वृंद आणि सर्वसामान्य लोकांनी सहभाग घेतला. 27 ऑगस्ट पर्यंत पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महापालिका, ठाणे परिसरात शाडू माती पासून गणेशमूर्ती बनविणे आणि जनजागृती कार्यक्रम एकूण 30 शाळांमध्ये घेणार आहेत. या कार्यशाळांचा अवधी २ तासांचा आहे. मुलांना शाडु माती पुरविण्यात येते आणि पर्यावरण दक्षता मंचच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडून मुर्ती तयार करून घेण्यात येते आणि मुलांना शाडू मूर्ती वापरण्याचे प्रयोजन आणि जनजागृती करण्यात येते. आपल्या संस्कृतीत निसर्गातून घेतलेले निसर्गाला परत करण्यालाही तेवढेच महत्त्व आहे. निसर्गातून जसे घेतले तसेच ते परत केले, तरच निसर्गचक्र पूर्ण होऊ शकते. निर्माल्याचे विघटन होऊन ते पुन्हा निसर्गात जाऊ शकते, पण मातीचे काय? जी माती जिथून काढली तिथेच ती परत जायला हवी. पण असे होताना दिसत नाही. त्यामुळे हा नैसर्गिक घटक जपून वापरला गेला पाहिजे. यासाठी जेवढे शक्य होतील तेवढी लहानात लहान आणि नैसर्गिक रंगाने रंगविली मूर्ती बनवून तिची प्रतिष्ठापना केली पाहिजे. शाडू मातीची मूर्ती लवकर विरघळते आणि ती माती पाण्याखाली जाऊन बसते हे सर्वसामान्यांना पर्यंत या जनजागृतींत सांगण्यात आले. हे लक्षात आल्यावर शाडूमाती पासून बनवलेली मूर्ती जरी लवकर पाण्यात विरघळत असली तरी वाहत्या पाण्यात विसर्जित न करता घरच्या घरी छोटा कृत्रिम तलाव तयार करून तेथे मूर्तीचे विसर्जन करावे. एखाद्या दिवसात संपूर्ण माती विरघळते आणि तळाशी जाऊन बसते. ती माती पाणी नितळ झाल्यावर वेगळी करून ठेवल्यास पुढच्यावर्षी आपण त्याच माती पासून मूर्ती तयार करू शकतो असे सांगितले. विविध रासायनिक रंगांनी रंगवलेल्या पीओपीच्या गणपतीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत. या मूर्ती खूपच आकर्षक असतात. या गणेशमूर्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगामध्ये शिसे, क्रोमियम, आयर्न यांसारखे अतिशय हानिकारक घटक मिसळलेले असतात. ठाणे महापालिका क्षेत्रात पर्यावरण पुरक गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, मूर्ती स्विकृती केंद्रे, खाडीचे घाट याठिकाणी सुविधा करण्यात येते. विसर्जनाच्या वेळी होणारे गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी App द्वारे Time Slot Booking ची सुविधा देण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading