विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेची ‘स्पेन’ वारी

दहीहंडीची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या ठाणे नगरीत यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लाखमोलाच्या दहीहंडीची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. या दहीहंडी उत्सवात विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेकडुन ‘स्पेन’ वारी घडवण्याची घोषणा मनसेचे ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे. नौपाडयातील भगवती मैदानात १९ ऑगस्ट रोजी जल्लोषात होणाऱ्या या दहीहंडीत ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना ११ लाखांचे सामुहिक बक्षिस तर एकुण ५५ लाखांची बक्षिसे जाहिर केली आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांना अपेक्षित असलेली मराठमोळी परंपरा जपुन यंदा प्रथमच दहीहंडी उत्सवामध्ये कोकणातील चाकरमान्यांसह वनवासी बांधवदेखील सहभागी होणार आहेत. अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली.
मागील वर्षी कोरोना काळात तत्कालीन सरकारने सण – उत्सवांवर लादलेली बंदी झुगारत ठाण्यात सर्वप्रथम मनसे उभी ठाकली होती. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुंच्या सणांसाठी आग्रही भूमिका घेतल्यानंतर अविनाश जाधव यांनी गतवर्षी कोविड नियम पाळुन योग्य ती खबरदारी घेत विश्वविक्रमी दहीहंडीचा सण साजरा केला होता.तर यंदाही मनसेच्या लाखमोलाच्या दहीहंडीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
मनसेच्या दही हंडीत विश्वविक्रमाची बरोबरी करणाऱ्या गोविंदा पथकातील सर्व बाळगोपाळाना स्पेन वारी घडवण्याची घोषणा अविनाश जाधव यांनी केली आहे. स्पेनमध्ये १६ नोव्हे. रोजी होणाऱ्या मानवी मनोऱ्यांच्या कॅसलर्स फेस्टीव्हलमध्ये या विश्वविक्रमी पथकाना सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
हिंदूच्या आणि मराठी सणांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेकवेळा आपली परखड भूमिका मांडलेली आहे. मागील सरकारच्या काळात कोविड दरम्यान निर्बंध लावून हिंदूंचे सणावर गदा आणण्याचे काम करण्यात आले होते. मात्र मनसेने आपले अनेक सण नियम झुगारून साजरे केले होते. दरम्यान राज्य सरकारने सणांवरची बंदी उठवली असून त्याच जल्लोषात मनसे दहीहंडी साजरी करण्यात येणार असल्याचे यावेळी मनसेचे ठाणे – पालघर जिल्हाध्यक्ष जाधव यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading