शहरातील मेट्रो भूमिगतच करण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

शहरामध्ये विकास केला जात असल्याचं दाखवण्यासाठी मेट्रो उभारली जात असून यामागे कोणतंही नियोजन नसल्याचा आरोप करत ठाण्यात होणारा मेट्रो ४ हा प्रकल्प भूमिगत करण्याची मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं एका पत्रकार परिषदेत केली आहे. मेट्रो ४ प्रकल्प करताना कोणत्याही प्रकारची जनसुनावणी घेण्यात आलेली नाही. मेट्रो रेल्वे ही उन्नत मार्गानं नेल्यावर कमी खर्चिक असल्याचा दावा केला जात असला तरी भूमिगत मेट्रोच अधिक किफायतशीर असल्याचा दावा या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ वास्तुविशारद नितीन किलावाला यांनी केला. मेट्रो भूमिगत केल्यास सध्याचं अंतरही कमी होऊ शकतं आणि ठाणे रेल्वे स्थानकाला ही जोडण्याबरोबरच विस्थापितांचा प्रश्नही मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो. विस्थापितांचा पुनर्वसनाचा खर्च आणि इतर अनुषंगिक गोष्टी पाहता भूमिगत मेट्रो उभारणंच फायदेशीर असल्याचं किलावाला यांनी सांगितलं. उन्नत मार्गाचे दुष्परिणाम पर्यावरणावर होणार असून मुलुंड ते कासारवडवली दरम्यान १ हजाराहून अधिक झाडं तोडावी लागणार आहेत. ठाणे मतदाता जागरण अभियानानं मेट्रो ४ बरोबरच अन्य उन्नत मेट्रो प्रकल्प हे भूमिगत करावेत यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. उन्नत मेट्रोसाठी सध्या फक्त सॉईल टेस्टींग सुरू असतानाच वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न भेडसावत असून उद्या प्रत्यक्षात काम सुरू झाल्यावर हा प्रश्न आणखी गंभीर होणार असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. मेट्रोचे खांब उभारण्यासाठी केलेल्या खड्ड्यांमुळे उद्या पावसाळ्यात ठाण्यातील वीज सेवेवर प्रतिकुल परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी मुंबई महानगर प्राधिकरणाची असेल असं महावितरणनं लेखी कळवल्याचं यावेळी सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे वाहतूक शाखेनंही मेट्रोच्या खांब उभारणीवर आक्षेप घेतले आहेत. टीपीआरमधील विसंगती दाखवून तसंच खरी माहिती दाबली जात असून यामुळं सर्व समावेशक आणि परिणामकारक मेट्रोचं धोरण बनवावं अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading