शहरातील कामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री पोलीस, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. शहरात सुरू असलेली विकासकामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या. हा रस्ता कुणाच्या मालकीचा आहे याचा विचार न करता त्यावरील खड्डे तत्काळ बुजवा. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात सध्या अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असून त्याचा मोठा ताण ठाणे शहरावर पडला आहे, परिणामी जागोजागी वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे बहुतांश कामे ही १ जूनपूर्वी पूर्ण करावीत तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना आतापासूनच हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. भिवंडी-कशेळी मार्गावरील काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. भिवंडीतील खराब रस्त्यांची डागडुजी तात्काळ करून घ्यावी. साकेत-खारेगाव पुलावर होणारी कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसीच्या माध्यमातून मुंबई-नाशिक महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, गरज वाटल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वापरण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ठाणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीदरम्यान अनेकदा काल्हेर ते आर. सी.पाटील दरम्यान मुंबई महापालिकेच्या पाईपलाईन रोडचा वापर केला जातो ह्या पाईपलाईन रोडची डागडुजी ताबडतोब करून तो सुस्थितीत आणण्याच्या सूचना मुंबई महापालिका आयुक्तांना दिल्या. मुंब्रा बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. मुंब्रा बाह्यवळण रस्त्याच्या कामाला गती देतानाच त्याच्या दुभाजकादरम्यान झाडे लावण्याचे तसेच त्यांच्या दोन्ही बाजू आधुनिक पद्धतीने बांबूच्या सहाय्याने सुशोभित करण्याचे निर्देश दिले. पुढील महिनाभर शहरातील वाहतूक नियमनाच्या कामावर असलेला ताण पाहता ठाणे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक पोलिसांना अतिरिक्त वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून द्यावे तसेच मुंबईतून अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घ्यावी असे निर्देश दिले. गायमुख- वाघबीळ मार्गावरील साईड पट्ट्यांचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले असून ते वेळेत पूर्ण करावे तसेच घोडबंदर रोड आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील सर्व्हिस रोड आणि महामार्ग दोन्ही वापरात आणावे. सर्व्हिस रोडचा पार्किंगसाठी होणारा वापर थांबवून वाहनांवर कारवाई करावी तसेच बसेस, ट्रक आणि स्कूल बसच्या पार्किंगसाठी खारेगाव टोलनाका तसेच पूर्व द्रुतगती मामार्गालगतचे जकात नाक्यांच्या मोकळ्या जागांचा वापर करावा असे निर्देश दिले.
कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेणार नाही असा इशारा देतानाच पावसाळ्यात रस्त्यावर पडणारा छोटा खड्डा देखील जीवघेणा ठरतो त्यामुळे रस्त्यावर खड्डे राहणार नाहीत याची जबाबदारी त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांची असेल. यात हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी, कंत्राटदारावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. लोकांना उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा देणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असून ती आपण सर्वांनी पार पडायला हवी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading