शहरांच्या वाटेवर असणाऱ्या गावांमध्येही आता नळपाणी योजना

कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या आणि शहरांच्या वेशीवर असल्याने झपाट्याने विकसीत होणाऱ्या कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील गावांमध्ये अजूनही नळ पाणी पुरवठा योजना नसल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे या गावांमध्ये स्वतःची पाणी पुरवठा योजना उभारण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून कल्याण तालुक्यातील पोसरी, शेलारपाडा, चिरड आणि पाली तसेच म्हारळ, वरप, कांबा आणि अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी, मांगरूळ, खरड आणि खोणी या गावातील नळ पाणी योजनांसाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून तब्बल ३८ कोटी ६० लाखांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे शहराच्या वेशीवर असलेल्या गावांमध्येही स्वतःची पाणी पुरवठा यंत्रणा विकसीत होणार आहे.
कल्याण आणि अंबरनाथ तालुक्याचा झपाट्याने विकास होतो आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात स्थानिक बांधकाम व्यावसायिक, कंपन्या यांच्यासह मुंबईतील अनेक कंपन्याही या दोन्ही तालुक्यांमध्ये गुंतवणूक करू लागले आहेत. या गुंतवणुकीमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या या दोन्ही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकल्प उभे राहू लागले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांनी गेल्या सात वर्षात केलेल्या सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कामाचे हे द्योतक आहे. शहरी भागात पायाभूत सुविधा उभारण्यासोबतच ग्रामीण भागातही वेळीच पायाभूत सुविधा उभारण्याची गरज आहे. त्यामुळे शिंदे यांनी याच दृष्टीने ग्रामीण भागात पाणी, रस्ते, आरोग्य, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन या प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या प्रयत्नातून शहराच्या वेशीवर असलेल्या आणि शहरांच्या बरोबरीने विकसीत होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये आता नळपाणी पुरवठा योजना उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातून कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील सुमारे ३९ गावांमध्ये पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी ४१ कोटी ६२ लाख रूपयांच्या अंदाजपत्रकीय रकमेला मंजुरी देण्यात आली होती. त्यातील नेवाळी, मांगरूळ आणि खरड या गावांमधील पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यासाठी २२ कोटी रूपयांचा प्रस्ताव तयार आहे. तर पोसरी, शेलारपाडा, चिरड आणि पाली या गावांमधील पाणी पुरवठा योजनेसाठी ५ कोटींची प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या कामाची जवळपास सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून येत्या महिनाभरात त्याला अंतिम मंजूरी दिली जाईल अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. तर खोणी गावातील पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यासाठी १ कोटी २० लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा या कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील गावांमध्येही स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबवण्यात येणार असून त्यासाठी १० कोटी ४० लाखांच्या प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. या तीनही गावातील पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. जलकुंभ आणि इतर गोष्टींसाठी जागेची पाहणी केली जाते आहे. या गावांना एमआयडीसीच्या माध्यमातून पाणी पुरवण्याचे उद्दीष्ट असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading