विरोधक सत्तेवर कसे यायचे याचा विचार करण्याऐवजी विरोधी पक्षामध्ये कसे यायचे अशी चिंता करत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा टोला

या निवडणुकीत कोणत्याही प्रकारची चुरस राहिलेली नसून विरोधक सत्तेवर कसे यायचे याचा विचार करण्याऐवजी विरोधी पक्षामध्ये कसे यायचे अशी चिंता करत असल्याचा टोला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी हा टोला लगावला. पुढील ५ वर्षात राज्य आणि ठाण्यामध्ये अनेक मोठे प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. समूह विकास योजना, जुन्या ठाण्याचा पुनर्विकास याबाबत सातत्यानं पाठपुरावा करून हे प्रश्न निकाली काढणा-या संजय केळकर आणि एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी विशेष कौतुक केलं. राज्यातील महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देण्याबरोबरच संजय केळकर यांनाही भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. राज्यामध्ये महायुतीला भरघोस जागा मिळणार असून महायुती २२० की २३० जागा जिंकणार एवढंच समजायचं बाकी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस निवडून येण्यासाठी आता फक्त ताजमहाल आणि चंद्रावर प्लॉट देण्याचं आश्वासन देण्याचं बाकी आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यामध्ये पायाभूत सोयीसुविधांचं जाळं उभारण्यात यश आलं आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २० हजार किलोमीटरचे रस्ते तयार करून राज्यानं रेकॉर्ड ब्रेक केलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading