विनामास्क फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे महापौरांचे आदेश

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावून वावरणे गरजेचे आहे. परंतु सार्वजनिक ठिकाणी अनेक नागरिक विनामास्क वावरत असल्याचे दिसून येत आहे. मास्क वापरण्याची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे व्हावी यासाठी जे नागरिक मास्क वापरणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई पोलीस विभागामार्फत करण्यात यावी असा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारवाईची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरता वावरणाऱ्या व्यक्तींकडून 500 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस विभागामार्फत वसुली करुन वसूल होणाऱ्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम ही ठाणे महानगरपालिका फंडात जमा करावी आणि उर्वरित रक्कम ही प्रशासकीय खर्च म्हणून पोलीस विभागाकडे जमा करण्यात यावी असे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरविण्यात आले आहे. शहरातील कोणतीही सार्वजनिक ठिकाणे, शासकीय आणि खाजगी कार्यालये या ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. परंतु काही नागरिक ‍विनामास्क सर्रास वावरत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ महापालिका किंवा पोलीस विभागाच्या तिजोरीत भर पडावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला नसून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे महापौर यांनी स्पष्ट केले आहे. ही कारवाई करत असताना विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून पावती शिवाय दंड वसूल करु नये. संचार करणाऱ्या व्यक्तींकडे मास्क नाही तसेच जाणीवपूर्वक मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर प्राधान्याने दंडात्मक कारवाई करावी. एखादी व्यक्ती एकटी असून विनामास्क फिरत असल्यास प्रथम त्यांना समज देण्यात यावी आणि त्यांच्याकडून सकारात्क प्रतिसाद मिळत नसल्यास दंडाची कारवाई करावी. याकामी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचा-यांनी स्वत: हॅण्डग्लोज, मास्क, फेसशिल्ड आदी साधनांचा वापर करावा, तसेच त्यांनी सामाजिक अंतर पाळावे असेही निर्देश महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत. आपले स्वत:चे जीवन सुरक्षित रहावे यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा, आपल्यापासून त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घ्यावी असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त विपीन शर्मा यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading