विद्या प्रसारक मंडळ आणि नामवंत औद्योगिक कंपन्यांमध्ये करार झाल्यामुळं या संस्थेत शिकणा-या विविध विद्यार्थ्यांना आता नामवंत कंपन्यांबरोबर काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय बेडेकर हे तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिक महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थ्यांनी काळासोबत रहावं यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतात. त्याचाच एक भाग म्हणून विद्या प्रसारक मंडळ आणि हेक्झॉगॉन, एमएससी अशा नामवंत कंपन्यांबरोबर झालेल्या बैठकीत ही फलश्रृती हाती आली आहे. विद्यार्थ्यांना मिळणारं शिक्षण हे उद्योगांना उपयोगी असणारं आणि नाविन्यपूर्ण असावं याकडे मंडळाच्या अध्यक्षांचा भर असतो. या कंपन्यांच्या अधिका-यांनी ठाण्यातील तंत्रनिकेतन आणि राजापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारामध्ये असलेल्या पायाभूत सोयीसुविधांबद्दल मंडळाचं कौतुक केलं. त्यामुळं विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष या कंपन्यांच्या प्रकल्पांमध्ये काम करण्याचा अनुभव घेता येणार आहे. त्यामुळं हे विद्यार्थी भविष्यात उद्योग स्नेही होऊ शकतील. विद्या प्रसारक मंडळातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जात असलेल्या सोयीसुविधांमध्ये हे एक महत्वाचं पाऊल असून यामुळं विद्यार्थी आणि देशाचं भवितव्य उज्ज्वल आणि बळकट होण्यास मदत होणार आहे.