विकासक आणि प्रशासनाच्या कासव गतीमुळं ट्रक टर्मिनस अडीच वर्ष रखडलं

ठाण्यातील नियोजित ट्रक टर्मिनस हे विकासक आणि प्रशासनाच्या कासव गतीमुळं रखडलं आहे. ठाण्यामध्ये अवजड आणि हलक्या वाहनांची रोज नवीन भर पडत असल्यानं पार्कींगची समस्या भेडसावत आहे. मॉडेला मिलच्या जागेवर वाहनतळ निर्माण करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता. मात्र प्रस्ताव मंजुरीनंतरही गेल्या अडीच वर्षात विकासक आणि प्रशासनाच्या कासव गतीमुळे हा विषय रखडला आहे. तीन हात नाक्यापासून मुलुंड चेकनाका आणि वागळे इस्टेट परिसरात अवजड वाहनं उभी करण्याची समस्या भेडसावत आहे. ही वाहनं रस्त्याच्या कडेला दाटीवाटीनं उभी केली जात असल्यामुळं ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यासाठी संजय केळकर यांनी मॉडेला मिलच्या जागेवर वाहनतळ उभारण्यासाठी पाठपुरावा केला होता. मॉडेलाच्या जागेवर विकासक चटईक्षेत्र निर्देशांकांच्या बदल्यात वाहनतळ आणि रूग्णालयासाठी जागा देणार आहे. विकास प्रस्तावामध्ये मंजूर विकास आराखड्यानुसार १७ हजार २१० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या वाहनतळाचा समावेश आहे. मॉडेला टेक्सटाईल इंडस्ट्रीज कंपनीने दाखल केलेला विकास प्रस्ताव फेब्रुवारी २०१६ मध्ये मंजूर झाला आहे. मात्र त्यानंतर आजतागायत एकही वीट रचली न गेल्यानं नियोजित ट्रक टर्मिनसवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी विविध पातळीवर पाठपुरावा करूनही अधिकारी ढिम्म राहिल्यानं संशय निर्माण झाला आहे. गेल्या अडीच वर्षात पालिका प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेत या प्रकरणास गती दिली असती किंवा अन्य पर्याय निर्माण केले असते तर ट्रक टर्मिनसची वाट ठाणेकरांना पहावी लागली नसती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading