वयाने मोठे होणे म्हणजे परिपक्व नाही खासदार श्रीकांत शिंदे यांचा सणसणीत टोला

मी विद्यार्थी असून सदैव शिकण्याच्या भूमिकेत आहे. जीतेंद्र आव्हाड लोकप्रतिनिधी म्हणून मला वरिष्ठ आहेत, वयानेही मोठे आहेत. भाषणातही त्यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे साहेबांपेक्षाही ते दोन वर्ष वरिष्ठ आहेत. मला परिपक्वता यायला वेळ लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे; परंतु, केवळ वयाने मोठे होणे म्हणजे परिपक्व होणे नाही, असा जबरदस्त टोला कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी गृहनिर्माण मंत्री जीतेंद्र आव्हाड यांना लगावला. खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत श्रीकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता परिपक्व होण्याचा सल्ला दिला होता. तसेच उड्डाणपुलाच्या गर्डरचे काम २०१७ मध्ये झाले. दोन्ही बाजूकडील पुलाचे काम तत्पूर्वीच झाले होते, असा दावा करत या उड्डाणपुलाचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्नही आव्हाड यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आव्हाड यांच्या या दाव्याचा चांगलाच समाचार घेतला. शिवसेनेला कुठल्याही कामाचे श्रेय घ्यायचे नाही. परंतु, आपण कामाचा पाठपुरावा केला असता तर निदान कुठले काम कधी झाले, याची टाइमलाइन तरी आपल्याला माहिती असती. गर्डर टाकायच्या आधीच पुलाच्या दोन्ही बाजूचे काम झाल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. परंतु, मफतलाल कंपनीची जागाच अधिग्रहीत झाली नव्हती. गर्डरचे काम झाले २०१७ मध्ये, मफतलालची जागा मिळाली २०१८ मध्ये. त्याचसुमारास खारेगाव मैदानातील पुलाची अलाइनमेंट बदलण्यात आली. मग दोन्ही बाजूकडील पुलाचे काम काय हवेत केले का, असा बोचरा सवाल श्रीकांत शिंदे यांनी केला. कळवा-मुंब्रामध्ये माझे ब्रह्मवाक्य आहे, असा दावाही आव्हाड यांनी केला. त्याचाही समाचार घेत शिंदे म्हणाले की, मी ब्रह्म नाही, मला ब्रह्म व्हायचे नाही. मी सतत शिकण्याच्या भूमिकेत आहे. आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत असेही विधान केले की, मी वडलांच्या भूमिकेत आहे, मुलाला सांभाळावं लागेल. त्याचाही समाचार शिंदे यांनी घेतला. मुलाच्या यशाने वडलांना कधीच त्रास होत नसतो, उलट वडील मुलाला प्रोत्साहन देत असतात. आनंद होत असतो, समाधान होत असते. इथे तर उलटे होतेय, मुलाच्या यशाने यांना त्रास होतोय, असा टोलाही शिंदे यांनी हाणला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading