कोणी काहीही सल्ले दिले तरी एकनाथ शिंदे आघाडीचा प्रस्ताव धुडकावणार नाही – जितेंद्र आव्हाड

आपल्याला शंभर टक्के वाटते की एकनाथ शिंदे आघाडीचा प्रस्ताव धुडकावणार नाहीत. हे असे कोणीतरी काहीतरी बोलले आणि काही सल्ले दिले म्हणून आघाडी तुटणार नाही. मी माझ्या बाजूने सांगो की, कोणी काहीही बोलले तरी मी आघाडीच्याच बाजूने आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. खारीगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या वेळी झालेल्या शाब्दीक चकमकीनंतर आव्हाड बोलत होते.आमदार झालो त्यावेळेस मी एक पुस्तक छापले होते. त्यामध्ये काय विकास कामे करणार याचा उल्लेख या पुस्तकामध्ये होता. तसेच तत्पूर्वीच म्हणजे 2009च्या निवडणूक जाहीरनाम्यातही हा पूल मार्गी लावणार, असे वचन कळवेकरांना दिले होते. आयुक्त राजीव असताना या पुलाचा सर्व्हे झाला. असीम गुप्ता यांच्या कार्यकाळात पुलाचे भूमिपुजन झाले.भूमिपुजनानंतर रेल्वेची परवानगी आणायची होती. आनंद परांजपे यांनी ही परवानगी मिळविली. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्याचवेळी मफतलालच्या जमिनीचा तिढा निर्माण झाला. आम्ही त्यावेळी हायकोर्टात वकील उभा केला. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी 39 कोटी रुपये मफतलालच्या जमिनीसाठी कोर्टात जमा केले. आपण तत्कालीन आयुक्त राजीव, असीम गुप्ता आणि जयस्वाल यांचे आभार मानतो की त्यांनी आपणाला विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे या पुलाच्याबाबतीत श्रेयवादाचा प्रश्नच येत नाही. कळव्यातील मुलांनाही माहित आहे की 2009 चे कळवा आणि 2022 चे कळवा कसे आहे ते! कळवा पूर्वेकडील लोकांना जर विचारले तर तेव्हा रस्ते कसे होते अन् आताचे कसे आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आपण ही विकासकामे केली आहेत. अन् कधीही एकनाथ शिंदेंचे श्रेय नाकारत नाही की त्यांनी कधीच माझा निधी अडवण्याचा प्रयत्न केला नाही. ठाणे पालिकेच्या सर्वच आयुक्तांसोबत माझे अत्यंत सलोख्याचे सबंध होते. त्यामुळे माझ्या संकल्पनेतील विकासकामांना खो बसला नाही. अन् पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कधी या विकास कामांच्या बाबतीत अडवणूक केली नाही. आनंद परांजपे यांनी पुलासाठी परवानगी आणली होती. पण 2014 साली आनंद परांजपे यांनी पुलासाठी परवानगी मिळविली आणि नंतर श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला. आता हे बघा, विटावा पादचारी पुल किचकट आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी मंजुरी दिली आहे. आता मी एकनाथ शिंदेंच्या हा पादचारी पुल पूर्ण करण्यासाठी मागे लागणार आहे. कारण, ते त्यांच्या खात्याचे काम आहे. या पुलाच्या उद्घाटनास घाई केली असल्याचे दिसून येत आहे, असे विचारले असता, या पुलावर पथदिवे लागतीलच; पण, हा कार्यक्रम कधी आहे हे मलाच काल सायंकाळी समजले. उद्घाटनाच्या आधी स्थानिक आमदाराशी चर्चा करायला हवी होती. पण मला त्याचे अजिबात दु:ख वाटत नाही. कारण, कळवेकरांना हे चांगलेच माहित आहे की काम कोणी केले आहे! कारण, ये पब्लीक है, सब जानती है! पत्रिका उशिरा दिली ही पालिका प्रशासनाची चूक आहे.
आम्ही दोघांनीही भाषणाच्या वेळी महाविकास आघाडीचा धर्म पाळला पाहिजे, असेच म्हटले आहे. मी नेहमी एकनाथ शिंदे यांचे आभार मानत असतो; मी मनात त्यांच्याबद्दल किंतू-परंतू ठेवत नाही. मला वाटते की जे काही होतेय ते बघू; त्या निमित्ताने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र तर आलेच ना! आम्ही दोघेही परिपक्व आहोत. आमच्या पक्षात आपल्याविरोधात कोणी जाणारे नाही.
महापौरांनी राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळावा, असे म्हटले आहे. त्याबद्दल विचारले असता, मी जे काही बोलायचे ते मंचावर बोललो आहे. मी त्यांना 15 वर्षे चाणक्य म्हणत आहे. पण नारदमुनीच्या भूमिकेत येऊ नका, असे आपण त्यांना सांगितले आहे. मिशन कळवाबाबत बोलणार्‍यांनी हेही पहावे की, जेव्हा कळव्यातील झोपड्या तुटत होत्या. त्यावेळी 5 हजार लोकांना घेऊन मी रेल्वे रुळांवर बसलो होतो. जिथे चालायला अवघड होते. तेथे आता मोठ्या गाड्या जात आहेत. ते अत्यंत हुशार आहेत. महापालिका बोटावर फिरवणारे श्रीकृष्णानंतरचे ते दुसरे अवतार आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलायचे?
पुलाच्या उद्घाटनाच्या बॅनर्सबाबत आव्हाड म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यानंतर तुमच्या लोकांनी हे का केले, असे विचारले होते. आपणाला उद्घाटनाची माहिती कालच मिळाल्यामुळे आपण तर बॅनरही लावले नाहीत. आपणच कार्यकर्त्यांना बॅनर्स लावू नका, असे सांगितले होते. तिथला एक कॅबिनेट मंत्री असतानाही पालिकेची ही वागणूक चुकीची आहे. पत्रिका वाटणे ही पालिकेची जबाबदारी आहे. ज्या कॅबिनेट मंत्र्याच्या मतदारसंघात कार्यक्रम आहे. त्याची पत्रिका 24 तास आधी पाठवता? आज आपला नाशिकचा कार्यक्रम होता. तरीही, मतदारसंघातला कार्यक्रम असल्यानेच मी येथे आलो. पण, पालिकेने सदर दिवशी आपण उपलब्ध आहात का, अशी विचारणाही केली नाही. आपण जयंत पाटलांचा आग्रह धरला होता; पण, वाद नको म्हणून मीच एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरणचा आग्रह धरला.
महाविकास आघाडीबाबत ते म्हणाले की, माझ्या पक्षात ठाणे जिल्ह्याबाबत महाविकास आघाडी संदर्भात कोणाच्याही विधानाला काडीचेही महत्व नाही. शिवसेनेचे शिवसेनेने बघावे. एकीकडे एकनाथ शिंदे स्टेजवर महाविकास आघाडी झाली पाहिजे, असे म्हणत असतील तर दुसरे काय म्हणतात, याबाबत मला बोलायचे नाही.
एकनाथ शिंदे यांच्याशी माझी मैत्री 1997 पासून आहे. मी त्यांना दोन वर्षे ज्येष्ठ आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा निर्णय आम्ही घेऊ. पण, जे बोलत आहेत त्यांनी परिपक्वता दाखवायला हवी. तरुण आहेत, सळसळते रक्त आहे; त्यामुळे आपणालाच त्यांना बापाच्या भूमिकेतून सांभाळून घ्यावे लागेल. पोरांना सांभाळावेच लागेल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading