रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालकांची मनमानी आणि इतर गैरसोयींना लवकरच आळा

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालकांची मनमानी आणि इतर गैरसोयींना लवकरच आळा बसणार आहे. खासदार राजन विचारे यांनी रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालकांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली होती. पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांना तात्काळ पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खासदार राजन विचारे आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह पाहणी करून समस्या सोडवण्याचे आदेश दिले. ठाणे रेल्वे स्थानकातील रिक्षा चालकांच्या मनमानीला आळा घालण्याबरोबरच प्रवाशांना होणारा मनस्ताप कमी करण्यासाठी रिक्षा स्टँड दोन्ही बाजूंनी सुरू करून एका ठिकाणी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग सुरू करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. रेल्वे स्थानकात महिलांच्या छेडछाडीचे अनेक प्रकार घडतात, त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रिक्षा चालकांची तक्रार करण्याकरिता स्वतंत्र पोलीस चौकी उभी करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. वाहतूक शाखेच्या महिला कर्मचा-यांसाठी येथे स्वतंत्र कक्षही दिला जाणार आहे. यापूर्वी रेल्वे स्थानक परिसरातून हटवलेली पोलीस चौकी पुन्हा उभी केली जाईल असं आश्वासनही महापालिका अधिका-यांकडून देण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading