रेल्वेलगत असलेल्या अतिक्रमणांवर १३ फेब्रुवारीला मुंबईत होणा-या बैठकीत निर्णय

रेल्वेलगत असलेल्या अतिक्रमणांवर १३ फेब्रुवारीला मुंबईत होणा-या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेने आपल्या जमिनींवरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केल्यामुळे ३०-४०वर्षांहूनही अधिक काळ राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या खासदारांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन पुनर्वसनाबाबत धोरण निश्चित करण्याची आग्रही मागणी केली. त्यानुसार १३ फेब्रुवारी रोजी मुंबईत राज्यसरकारचे अधिकारी आणि खासदारांसमवेत बैठक घेऊन पुनर्वसनाबाबतचे धोरण निश्चित करण्यात येईल असे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हजारो बाधितांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेल्वेने गेल्या आठवड्यात अचानक कल्याण, डोंबिवली, मुंब्रा आदी भागात कारवाई सुरू केल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करत कारवाई थांबवण्याची विनंती दानवे यांना केली होती. येथे ३०-४० वर्षांहून अधिक काळ रहिवासी राहत असल्यामुळे त्यांचे पुनर्वसन करून मगच जमिनी मोकळ्या कराव्यात अशी भूमिका शिंदे यांनी मांडली. दोन्ही मंत्र्यांनी पुनर्वसनाबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून मुंबईत १३ फेब्रुवारी बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading