रुग्णालयांना अखंडित वीजपुरवठा करण्यासोबतच अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व कोविड केंद्रांसह रुग्णालयांना अखंडित वीजपुरवठा होत राहील, याची खबरदारी घेण्याबरोबरच अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी बोलताना त्यांनी हे निर्देश दिले. ठाणे, उल्हासनगर, भिवंडी येथील अतिधोकादायक इमारतीचा प्रश्न गंभीर असल्याने अशा इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्याबरोबरच दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांनाही सुरक्षित स्थळी हलवण्याची सूचना त्यांनी केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यासोबत आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारी सारी साधने सज्ज ठेवण्यास सांगितले. याशिवाय शहरातील उत्तम पोहणारे आणि पाणबुडे यांच्या याद्या तयार ठेवण्यासही त्यांनी सांगितले. शहरात प्रामुख्याने झाडे पडून किंवा मॅनहोलची झाकणे उघडी राहून दुर्घटना होणार नाही, याची खबरदारी घ्या. शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा ट्रान्सफॉर्मर तुटल्यास त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी पथके तैनात ठेवा, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, पीडब्लूडी, पालिका यांच्या अखत्यारितील सर्व रस्त्यांची डागडुजीची कामे वेळेत पूर्ण करून त्यावर खड्डे राहू नयेत याची काळजी घ्या, तुंबलेल्या पाण्याचा तातडीने निचरा होण्यासाठी पथके तैनात ठेवा, प्रभाग समिती निहाय आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना व्यवस्थित प्रसिद्धी द्या, असे निर्देश शिंदे यांनी दिले. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत करण्यासाठी ठाणे महापालिकेने टीडीआरएफ पथकाची स्थापना केली आहे. महाडच्या सावित्री पुलाची दुर्घटना असो वा उल्हासनगर येथे झालेली इमारत दुर्घटना असो, या पथकाने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे प्रत्येक महापालिकेने टीडीआरएफच्या धर्तीवर पथक स्थापन करावे अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading