राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ऐंशी पूर्ण केलेल्या अकरा स्वयंसेवकांचा सत्कार

वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ स्वयंसेवकांचा काल सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ठाणे जिल्हा संघचालक अरविंद जोशी यांच्या हस्ते सहस्त्रचंद्र दर्शन पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रताप व्यायाम शाळेत करण्यात आले होते. बाल स्वयंसेवक म्हणून संघाच्या संपर्कात येऊन आपले कौटुंबिक जीवन सांभाळून दीर्घकाळ संघ विचार रुजविण्याचे काम करणाऱ्या अकरा स्वयंसेवकांचा कौतुक सोहळा झाला. ज्येष्ठ स्वयंसेवक अच्युतराव वैद्य, जयराम क्षीरसागर, आनंद भागवत, स.गं.जोशी, सुधाकर ओजाळे, श्रीराम आगाशे, डॉ.पां. रा.किनरे, दिनकर दामले, शरद भावे, विष्णूपंत भिडे आणि दत्तात्रय निमकर या ठाण्यातील स्वयंसेवकांच्या कौतुकाने त्या मंतरलेल्या दिवसांची पुन्हा अनुभूती आली. अकरा जणांच्या मुलाखतीतून संघाच्या कामाच्या आठवणी जागवल्या गेल्या. संघाच्या कामाचे टप्पे उलगडले गेले. त्यावेळची आव्हान आणि त्यावर तत्कालीन स्वयंसेवकांनी केलेली मात याची उदाहरण सांगितली. संघाच्या विचारांचे झालेले स्वागत आणि त्यातून निर्माण झालेल्या विविध कामाचा आढावा घेण्यात आला. संघाचा पाया रचणाऱ्या दिवंगत स्वयंसेवकांच्या स्मृतीचे यावेळी जागरण करण्यात आले. संघ विचारांची आणि कार्याची सर्व क्षेत्रात होणारी वाढ या विषयी या ज्येष्ठ स्वयंसेवकांनी समाधान व्यक्त केले. संघाच्या शताब्दी वर्षात योगदान देण्याची इच्छा या अकरा कौतुकमुर्तींनी व्यक्त केली. चार तास झालेल्या या कार्यक्रमाने नवी ऊर्जा दिली अशी भावना सगळ्यांनी व्यक्त केली. या हृद्य सोहळ्याने संघाच्या स्नेह भावाचे दर्शन झाले आहे. या सत्कार समारंभाने ‘माणसांचे काम’ हा संघाचा स्वभाव अधोरेखित झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लवकरच शंभरीत प्रवेश करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या आठवणी नव्या पिढीसमोर मांडण्याच्या हेतूने हा कार्यक्रम योजला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading