जिल्ह्यात २५ जूनपासून कृषी संजीवनी मोहीम

खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कोकण विभागात २५ जून ते १ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांमार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असे विभागीय कृषि सह संचालक अंकुश माने यांनी सांगितले आहे. २५ जूनला विविध पिकांची तंत्रज्ञान प्रसार आणि मूल्य साखळी बळकटीकरण पिकांची लागवड तंत्रज्ञान, कडधान्य पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश, वाण, बियाणे निवड, बीजप्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २६ जूनला पौष्टिक तृणधान्य दिवस यामध्ये पौष्टिक तृणधान्यांची लागवड तंत्रज्ञान, पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व, पिक प्रक्रिया, मूल्यवर्धन तसेच शेत तिथे पौष्टिक तृणधान्य संकल्पना याबाबत मार्गदर्शन केले जाईल. २७ जूनला महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण दिवस यामध्ये महिलांचे चर्चासत्र, परिसंवाद, व्याख्यानमाला, महिलांकरिता कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण, पिक तंत्रज्ञान आणि महिलांना वापरता येतील असे शेतीतील यंत्रसामग्री संदर्भात माहिती देण्यात येणार आहे. २८ जूनला खत बचत दिन यामध्ये जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, पिकांची खतमात्रा बनवणे, सूक्ष्म मलद्रव्य महत्त्व, खतांच्या अतिवापरामुळे होणा-या दुष्परिणामाविषयी मार्गदर्शन केले जाईल. २९ जूनला प्रगतीशील शेतकरी संवाद दिवस यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील रिसोर्स बँक मधील शेतकऱ्यांकडून त्यांनी अवलंबिलेल्या तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतावर क्षेत्रीय भेटी आयोजित करण्यात येणार आहेत. ३० जून रोजी शेती पुरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस यामध्ये शेती व्यवसायास पूरक जोडधंदा म्हणून फलोत्पादन, संरक्षित शेती, भाजीपाला, फूल लागवड, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेततळ्यातील मत्स्यपालन, रेशीम, मधुमक्षिकापालन खादी ग्राम उदयोग इत्यादी विभागांचे तंत्रज्ञान व योजनाची माहिती देण्यात येईल. १ जुलै रोजी कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता होऊन कृषी दिन साजरा होईल. सप्ताहादरम्यान कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था यांनी संशोधित केलेल्या अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आणि कृषी विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. या व्यतिरिक्त या कालावधीत ग्राम कृषी विकास समितीच्या बैठका घेऊन गावातील शेतीचे नियोजन कसे करावे याबाबत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading