राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अमीत सरैया आणि सामाजिक कार्यकर्ते मयूर शिंदे यांनी सावरकर नगर भागात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात सुमारे 80 जणांना तत्काळ नोकर्या मिळाल्या आहेत. तर, 208 जणांना लवकरच नियुक्तीपत्र विविध कंपन्यांकडून देण्यात येणार आहे. सावकरनगर येथे मयूर शिंदे यांच्या कार्यालयामध्ये या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कोविड काळात उत्तीर्ण झालेल्यांना नोकर्या देण्यात अनेक व्यवस्थापन नकारघंटा वाजवित असताना, याच काळातील यशस्वी विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावा आयोजित करुन नवीन सुरुवात केली आहे. या मेळाव्यात अभियांत्रिकीसह उच्च शिक्षण घेतलेल्या 48 उमेदवारांसह सुमारे 208 पेक्षा अधिक तरुणांनी आपला बायोडाटा जमा केला. त्यापैकी 80 जणांना ‘ऑन दि स्पॉट’ नियुक्तीपत्र देण्यात आले. तर, 35 जणांना पॅकिंग आणि हाऊस किपींगसाठी निवडण्यात आले आहे. त्यांना आगामी आठवड्याभरात नियुक्तीपत्र दिले जाणार असून उर्वरित तरुणांनाही लवकरच नोकरी मिळणार आहे.