घोडबंदर रोडवरील पाणी टंचाईबाबत भारतीय जनता पक्षाचा महापालिकेवर धडक मोर्चा

घोडबंदर रोडवरील तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापालिकेवर आज धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी घोडबंदर रोडवरील रहिवाशांबरोबरच भाजपा कार्यकर्त्यांनी महापालिकेला पाणीटंचाईचा जाब विचारला. शहरातील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपने काढलेला आजचा आठवा मोर्चा होता. घोडबंदर रोडवरील तीव्र पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र धरण उभारण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. कापूरबावडीपासून थेट गायमुखपर्यंत अनेक गृहसंकुले आणि इमारती उभारल्या गेल्या. मात्र त्या तुलनेत पाणीपुरवठ्याच्या सुविधा वाढविल्या गेल्या नाहीत. सत्ताधारी शिवसेनेच्याच कृपेने टँकर लॉबी फोफावली आहे असा आरोप मोर्चात करण्यात आला. सत्ताधाऱ्यांच्या कृपेने ठाणेकरांच्या हक्काचे पाणी टँकर लॉबीला दिले जात आहे. यापुढे पुरेसे पाणी मिळेपर्यंत आणि स्वतंत्र धरण होईपर्यंत भाजपचे आंदोलन सुरूच राहील, अशी ग्वाही आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. वागळे इस्टेट परिसराला १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दिला गेला. मात्र, घोडबंदररोडला वाऱ्यावर सोडण्यात आले. पालकमंत्री हे केवळ वागळे इस्टेटचे पालकमंत्री आहेत का? असा टोला आमदार संजय केळकर यांनी लगावला. यापुढील काळात पाणीप्रश्न न सुटल्यास महापालिकेला घेराव घालण्यात येईल, असा इशाराही केळकर यांनी दिला. घोडबंदर रोड परिसरातील गृहसंकुले आणि इमारतींमधून कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला जातो. बंद कूपनलिका सुरू करणे, विहिरी साफ करणे, विकासकांनी घेतलेल्या बेकायदा नळ जोडणी शोधून ती तोडण्यात पालिका आयुक्तांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिल्याचं निरंजन डावखरे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading