राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहाचे नूतनीकरण चार महिन्यात पूर्ण करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रशिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहाचे नूतनीकरण चार महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहांच्या सुधारणेबाबत ठाणे महापालिकेस आदेश दिले आहेत. निवासी डॉक्टरांना सर्वोच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. त्याच्या नियोजनासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी निवासी डॉक्टरांच्या रुग्णालय परिसरातील तिन्ही वसतीगृहांची पाहणी केली. निवासी डॉक्टरांचे कॅन्टीन, व्यायामशाळा, खेळाच्या सुविधा आदींचे अवलोकन केल्यावर संबंधितांची बैठक घेतली. वसतीगृहाच्या इमारतीचे नूतनीकरण करताना त्यात एकूण १०० निवासी डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था केली जावी. तसेच पुरेसा सूर्यप्रकाश, वायुविजन यासाठी आवश्यक ते बदल केले जावेत. कॉमन रूम, व्यायामशाळा यांची रचना चांगली करावी. प्रवेशद्वारे मोठी आणि कोणत्याही अडथळ्याविना असतील हे पहावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. वसतीगृहाच्या समोर आणि मागील बाजूस असलेल्या जागेचा वापर निवासी डॉक्टरांना क्रीडा सुविधा देण्यासाठी करावा. त्यांच्याशी चर्चा करून खेळासाठी लागणारी व्यवस्था उभी करावी असे आयुक्त बांगर म्हणाले. वसतीगृहालगतच्या मोकळ्या जागेत अभ्यास, मनोरंजन यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच त्या सेवा कॅन्टीनशी जोडून घ्याव्यात असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी रुग्णालयाच्या परिसरात आल्यावर येणारा तो ठराविक दर्प ठरवून दूर करायला हवा. योग्य स्वच्छ्ता आणि चांगल्या दर्जाची जंतूनाशके वापरली तर रुग्णालय परिसर दर्प मुक्त करणे शक्य आहे, असे निरीक्षण आयुक्त बांगर यांनी नोंदवले. त्याचबरोबर रुग्णालय आवार, इमारती यात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading