येऊरचे गेट रात्री १० वाजता बंद होणार

गेल्या अनेक दिवसांपासून येऊरमधील नंगानाच, डिजेचा कर्णकर्कश आवाज या विरोधात आदिवासींनी एल्गार पुकारला आहे. त्यानंतर वनखाते सक्रीय झाले असून काल झालेल्या बैठकीत येऊरमधील प्रवेशासाठी रात्री दहा तर येऊरमधून ठाण्यात परतण्यासाठी रात्री ११ वाजता प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत येऊरमध्ये कोणालाही प्रवेश मिळणार नाही. रात्री ११ नंतर कोणाला येऊर मधून बाहेरही पडता येणार नाही. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अनेक वन्य प्राणी पक्षी आणि आदिवासी बांधवांचा वावर असतो. मात्र हळूहळू हे जंगल नाहीसे होत चालले असल्याने स्थानिक आदिवासींनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. येथे मोठ्या प्रमाणात रात्रभर सुरू असलेल्या पार्ट्या, DJ चा मोठ्या प्रमाणात आवाज, रात्रभर चालणारे क्रिकेट टर्फ, दारू आणि अमली पदार्थ विकणे, कचरा जंगलात टाकणे, अनाधिकृत पार्किंगसह येऊर येथे नंगा नाच हे सर्व प्रकार खुलेआम सुरू असून आदिवासी बांधवांनी ‘येऊर जंगल वाचवा’ मोहीम सुरू केली आहे. येऊर आदिवासी वनहक्क समितीच्या वतीने आक्रमक पाऊल उचलल्यानंतर वनमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत येऊरमधील अनधिकृत बांधकामे आणि चालणारा धिंगाणा यावर चर्चा झाली होती. काल पुन्हा याच विषयावर मुंबईत बैठक झाली. या बैठकीत येऊरमधील प्रवेशावर निर्णय घेण्यात आला. मुनगंटीवार यांनी येऊरमध्ये रात्री दहानंतर प्रवेशबंदी करण्याचे आदेश दिले. येऊरमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र दहा दिवसांनंतरही कारवाई न करण्यात आल्याने वनमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading