मुख्यमंत्री जरी असलो तरी मी सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे कोणी किती टिका केली तरी आपण आपले काम करत राहणार – एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री जरी असलो तरी मी सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे कोणी किती टिका केली तरी आपण आपले काम करत राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. रंगाई निर्मित रंगात रंगली दिवाळी या कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी हे स्पष्ट केलं. रंगात रंगली दिवाळी या रौप्यमहोत्सवी दिवाळी पहाट कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेल्या उपस्थितीनी ठाणेकरांची मने जिंकली. राज्याचा विकास हेच आपले ध्येय आहे, त्यामुळे राज्याच्या जनतेसाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविले जाणार आहेत. प्रवास सुखकर व्हावा यासाठी ठाणे ते बोरीवली असा भुयारी मार्ग प्रस्तावित असुन हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रवाशांना 15 मिनिटांत बोरिवली येथे पोहचता येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. वाहतूक कोंडी मुक्त ठाणे आणि खड्डेमुक्त रस्ते अशी मागणी सभागृहातून येताच मुख्यमंत्र्यांनी लगेचच ही मागणी पूर्ण करण्याचा शब्द ठाणेकरांना दिला. भक्तीगीते आणि भावगीतांच्या सुरेल मेजवानीसह अभिनेत्री सुप्रिया पाठारे आणि गिरीजा ओक यांच्याशी खुमासदार गप्पा अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळाली. कलाकार म्हणून काम करताना रसिकांनी दिलेल्या शुभेच्छा तसेच आपल्या आयुष्यात आलेले चांगले वाईट अनुभव सुप्रिया पाठारे आणि गिरीजा ओक यांनी कथन केले. रसिकांनी देखील टाळ्यांची दाद देत या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला. यावेळी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकाचे 11 व्या आवृत्तीचे, तर ‘दुसरे वादळ’ या पुस्तकाचे आणि गुढीपाडव्याला प्रकाशित होणाऱ्या ‘बेधडक’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading