मुख्यमंत्री उद्या आमच्या एन्काउंटरचे आदेशही देऊ शकतील – आनंद परांजपे यांचा खळबळजनक आरोप

ठाणे पोलीस दलातील पोलीस आयुक्त जयजीत सिंग, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त गणेश गावडे आणि अमरसिंह जाधव हे सत्ताधार्‍यांची प्रायव्हेट आर्मीसारखे काम करीत आहेत; त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश म्हस्के हे पोलीस आयुक्त जयजीतसिंग यांना आपला एन्काउंटर करण्याचे आदेश देतील आणि पोलीस आयुक्तही खुर्चीतून उठून आदेश पाळण्याची ग्वाही देतील असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. 22 डिसेंबर रोजी जयंत पाटील यांचे विधानसभेत निलंबन करण्यात आल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केले. त्यानंतर पोलीस यंत्रणेचा गैरवापर करुन ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये 11 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणी न्यायालयाने अटक न करण्याचे आदेश दिले असून 18 जानेवारी रोजी त्यावर पुढील सुनावणी होणार आहे.
घटनाबाह्य शिंदे सरकारचा विरोध केल्यास ठाणे पोलीस राजकीय कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत. ज्यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत खोटा इतिहास दाखविणार्‍या ‘हर हर महादेव’ या सिनेमाच्या विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर नोटीस घेण्यासाठी बोलावून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह आम्हा 11 कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करुन एक रात्र पोलीस कोठडीमध्ये डांबण्यात आले होते. या प्रकरणात जेव्हा जामीन देण्यात आला. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले. या गुन्ह्यात नोंदविलेले कलम चुकीचे असल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यानंतर रिदा रशीद या महिलेचा वापर करुन आव्हाड यांच्यावर विनयभंगासारखा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळीही अटकपूर्व जामीन देताना अशा पद्धतीचा गुन्हा कसा नोंद होऊ शकतो, अशी टीप्पणी न्यायालयाने केली होती. विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी ज्या महिलेचा वापर करण्यात आला आहे. त्या महिलेवरच हाणामारी आणि ठार मारण्याची धमकी; लहान मुलीकडून वेश्याव्यवसाय करुन घेण्याचा अर्थात पिटा आणि पोक्सोसारखा अत्यंत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असतानाही ही महिला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधिमंडळ परिसरात फिरत होती. तिथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला होता. त्याची पोस्ट फेसबुकवर अपलोडही करतात. मात्र, पोलिसांना त्या दिसल्या नाहीत; त्यानंतर 4 जानेवारी रोजी मंत्रालय परिसरात रिदा रशीद फिरत होत्या. तरीही, त्यांना अटक का करण्यात येत नाही? असा सवाल परांजपे यांनी उपस्थित केला. तर, मुख्यमंत्र्यांचे जवळचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी भाजपचे प्रशांत जाधव यांना मारहाण केली. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. असे असतानाही विकास रेपाळे आणि नम्रता भोसले मुक्तपणे संचार करीत आहेत. कोणतीही कारवाई करायला ठाणे पोलीस तयार नाहीत.
पन्नास खोके, एकदम ओके ; भूखंडाचे श्रीखंड अशा आशयाचे फलक लावल्याप्रकरणी तीन ज्ञात आणि 2 अज्ञात व्यक्तींवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैकी तिघांना अटक करुन जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. असे असले तरी 2 अज्ञातांची नावे स्पष्ट नसतानाही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रम खामकर आणि विधानसभाध्यक्ष अभिषेक पुसाळकर हे दोघे घरी नसताना 10 वेळा घरी जाऊन त्यांच्या घरातील महिलावर्गाला दमदाटी करीत आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे, शुक्रवारी या दोघांना जामीन झालेला असतानाही पुन्हा पोलिसांनी त्यांच्या घरात प्रवेश करुन दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकाराकडे पाहिल्यानंतर पोलीस आयुक्तांना प्रश्न विचारावासा वाटतो की, तुम्ही जनतेचे सेवक आहात की तुमच्या राजकीय मालकांचे? आयपीएस म्हणून सेवेत येताना घेतलेली शपथ ते विसरले आहेत का? पोलीस हे कायद्याचे रक्षण करण्यासाठी आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. उद्या राज्यकर्ते बदलतील; पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान आणि कायद्याचे राज्यच चिरंतन राहणार आहे. त्यामुळे बेकायदेशीर एफआयआर नोंदवून त्रास देण्याचे प्रकार थांबवावेत; अशा कारवायांनी आपण घाबरणार नाही. आपणावर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यांच्या प्रकरणात आपण लढत आहोत. तुमच्या राजकीय मालकांना खुश करण्यासाठी गुन्हे दाखल कराल; पण, आम्ही घरी बसणार नाही. या लोकांना एकच सांगणे आहे की गोळी घालायची असेल तर छातीत घाला; पाठीवर घालू नका. कारण मी डोळ्यात डोळे घालून आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे. माझी लढाई या घटनाबाह्य सरकारच्या विरोधात अशीच सुरुच राहिल. अस परांजपे म्हणाले .

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading