मुंबई महानगर प्रदेशातील प्रलंबित विषय प्राधान्याने मार्गी लागणार – सोनिया सेठी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नगरविकास विभागाकडे संपूर्ण लक्ष आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील महापालिकांचे प्रलंबित विषय प्राधान्याने मार्गी लागतील, असा विश्वास प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी व्यक्त केला. ठाणे, भिवंडी, पनवेल, उल्हासनगर आणि वसई – विरार या पाच महापालिकांच्या, नगरविकास विभागाकडील विषयांचा आढावा घेण्यासाठी सोनिया सेठी ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, प्रकल्प, शहर सुशोभीकरण अभियान, नगरविकास विभागाकडे प्रलंबित असलेले विषय, तसेच विविध समस्या यांच्याविषयी सोनिया सेठी यांनी बैठकीस मार्गदर्शन केले. सगळ्यांनी सूत्रबद्ध आराखडा तयार करून आपापल्या पालिकेतील विषय निदर्शनास आणले तर त्यावर कालबध्द उपाययोजना करता येतील, असे सोनिया सेठी यांनी स्पष्ट केले. अमृत, प्रधानमंत्री आवास योजना, पीएम स्वनिधी योजना, स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्प आदी केंद्र आणि राज्य सरकार पुरस्कृत योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीदरम्यान सेठी यांनी ठाणे महापालिकेच्या विविध उपक्रमांचे उदघाटन केले. दिव्यांग व्यक्तींना स्वयंपूर्ण करण्यासाठी महापालिका आणि टी स्टॉल ओनर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या उपक्रमात चहाच्या स्टॉलचे वाटप सोनिया सेठी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रायोगिक स्वरूपात सध्या नऊ जणांना हे स्टॉल देण्यात आले. तसेच, ठाणे महापालिका आणि प्रथम संस्था यांच्या वतीने देण्यात आलेले गवंडी कामाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिला आणि पुरुषांना साधन सामुग्रीचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर, महागड्या साधन सामुग्रीचा संग्रह असलेल्या कक्षाचे अनावरण, शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या आदर्श स्वच्छ शाळा मोहिमेचा आरंभ सोनिया सेठी यांच्या हस्ते करण्यात आला. शून्य कचरा व्यवस्थापनाचा भाग असलेले हे जन जागृती अभियान असून त्यात ठाणे महापालिका हद्दीतील ६३१ सरकारी आणि खाजगी शाळा सहभागी झाल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading