मिशन कळवा राबवलं तर कमिशन टीएमसी मिशन राबवण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

मिशन कळव्याची भाषा करणार्‍यांनी ध्यानात ठेवावे की आम्ही जर कमिशन टीएमसी उघडकीस आणले तर ठाणेकरांना तोंड दाखवायला तुम्हाला जागा उरणार नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला.
खारीगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम आनंद परांजपे हे खासदार असताना मंजूर करून घेतले होते. हे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी मिशन कळवा सुरू करून सबंध कळव्यात शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणू, असा दावा केला होता. त्यांच्या या विधानाचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला. काल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि महापौर नरेश म्हस्के यांनी येणार्‍या वर्षामध्ये मिशन कळवा राबवून कळव्यात शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणू, अशा प्रकारची जी मोठी घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे येत्या आठवड्यात शिवसेना मिशन मुंब्रा सुरु करणार आहे. या त्यांच्या घोषणेचे स्वागतच आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. नवीन वर्षामध्ये कमिशन टीएमसी म्हणजेच शौचालयापासून कचर्‍यापर्यंत आणि रस्त्यापासून परिवहन सेवेपर्यंत आणि पाण्यापासून स्मार्ट सिटीपर्यंत जे काही कमीशन खाल्ले गेले. त्याबाबत जनजागृती मोहीम राष्ट्रवादी सुरु करणार आहे. अन् याची उत्तरे देताना महापौर नरेश म्हस्के यांचे राजकीय कसब पणास लागेल, याचा आपणाला विश्वास आहे. त्यांच्या कमिशन कळव्याचे स्वागत करताना कमिशन टीएमसी ही मोहीम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रत्येक वॉर्डात सुरु करतील. म्हणजेच, ठाण्यात न उचलला जाणारा कचरा, घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा, टीएमटीचे वाजलेले बारा, स्मार्ट सिटीमध्ये रखडलेले प्रकल्प या सर्वांबाबतची जनजागृती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणार्‍या वर्षामध्ये करणार आहे.आम्हाला पक्षश्रेष्ठी जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आदेश दिले तर आम्ही आघाडी करायला तयार आहोत. पण, जर ते मिशन कळवा राबविणार असतील तर आम्ही कमिशन टीएमसी राबवू असं आव्हानही आनंद परांजपे यांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading