ठाणे महापालिकेनं एप्रिल ते जुलै या कालावधीचा मालमत्ता कर पूर्णपणे माफ करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव संदीप लेले यांनी केली आहे. महापालिका आयुक्तांना एक निवेदन देऊन त्यांनी ही मागणी केली आहे. गेले ४ महिने टाळेबंदीमुळे सर्व आस्थापने, व्यवसाय, उद्योगधंदे ठप्प आहेत. कोणतीही आर्थिक उलाढाल होत नसून ही परिस्थिती अजून किती काळ राहील याचीही शाश्वती नाही. या अनुषंगाने सरसकट मालमत्ता कर आकारणं योग्य होणार नाही. त्यामुळं सर्व बाबींचा विचार करून एप्रिल ते जुलै या कालावधीचा कर पूर्णपणे माफ करण्यात यावा आणि पुढील परिस्थितीचा सापेक्ष विचार करून मालमत्ता कराची आकारणी करावी अशी मागणी लेले यांनी केली आहे.