महापालिकेतील सत्ताधा-यांकडून कोट्यावधींची उधळण – भारतीय जनता पक्षाची टीका

ठाणे महापालिकेकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत. मात्र, त्याचवेळी साडेपाच कोटींची प्रस्तावित रंगमंच दुरुस्ती, १४ कोटींचे पादचारी पूल, पदाधिकाऱ्यांसाठी ७० लाखांची वाहने आदींसाठी सत्ताधाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची बेलगाम उधळपट्टी केली जात आहे, अशी टीका मनोहर डुंबरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. कोरोना आपत्तीनंतर ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली. महापालिकेवर ठेवी मोडण्याची वेळ आली. तर अर्थसंकल्पात काटकसरीचे सुतोवाच करण्यात आले. प्रत्यक्षात महापालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. त्याला सत्ताधारी शिवसेनेचा आशीर्वाद असून, शिवसेनेकडून बहुमताच्या जोरावर कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. आगामी काळात तब्बल साडेपाच कोटी रुपये खर्चून रंगमंचाची दुरु्स्ती करण्याचा प्रस्ताव आणला जात आहे. यापूर्वी १४ कोटी रुपये खर्चून अनावश्यक पादचारी पूल उभारले गेले. जनमताकडे दुर्लक्ष करून काही पदाधिकारी ७० लाखांच्या मोटारीत विराजमान झाले. कोरोना आपत्तीनंतर तिजोरीतील पैसा आटल्यावरही बेलगाम उधळपट्टी करण्यात सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांना आनंद होत आहे, अशी टीका डुंबरे यांनी केली. विशेष म्हणजे या विषयावर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना बोलूही दिले जात नाही, याबद्दल गटनेते डुंबरे यांनी नाराजी व्यक्त केली.कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी केली जात आहे. त्यासाठी कोट्यवधींच्या औषधांचा साठा खरेदी करण्यात आला. मात्र, ग्लोबल कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या ५०० हून अधिक कोरोना योद्ध्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. रिकाम्या हॉस्पिटलमधील २५ टक्के बेडचे पैसे कंत्राटदारांना देताना सत्ताधाऱ्यांना काहीही वाटत नाही. मात्र कोरोना योद्ध्यांना नोकरीवरून काढल्यावर सत्ताधारी ढीम्म झाले आहेत. जीवाची पर्वा न करणाऱ्या कोरोना योद्ध्यांविषयी सत्ताधारी निष्ठूरपणाने वागत आहेत अशी टीका मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading