महापालिकेच्या शहर विकास विभागावर आगीच्या सावटामुळे उपाययोजना करण्याची भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागावर अनेक गैरव्यवहाराच्या आरोपामुळे आगीचं सावट असल्याची भीती असून या पार्श्वभूमीवर शहर विकास विभागाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी विनंती भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागानं काही वर्षांपासून हजारो इमारतींचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यानुसार बांधकाम व्यावसायिकाना सीसी, पार्ट ओसी, ओसी, टीडीआर देण्याची अनेक कागदपत्रं आहेत. त्यातील काही वादग्रस्त प्रस्तावांबाबत अनेक तक्रारी सरकार दरबारी दाखल आहेत तर काही व्यवहारांबाबत न्यायालयात जनहित याचिका दाखल आहे. या सर्व फाईल्सचा स्फोटक साठा शहर विकास विभागात आहे याकडे नारायण पवार यांनी आयुक्तांचं लक्ष वेधलं आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात डीजी ठाणेचा गवगवा केला जातो मात्र शहर विकास विभागातील सर्व व्यवहार डिजीटल झालेले नाहीत. सर्व व्यवहार कागदी फाईल्सवरच आहेत. कधीकाळी वादग्रस्त प्रकरणातील फाईल्स उघडल्यास वरिष्ठ अधिका-यांचे तीनतेरा वाजू शकतात. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अधिका-यांमधील वाद आणि दुफळी व्हॉटस् ॲपच्या निमित्तानं उघड झाली. या पार्श्वभूमीवर आणि बदलती प्रशासकीय स्थिती लक्षात घेऊन शहर विकास विभागाला आग लागण्याची भीती वाटते. या आगीपासून संरक्षण मिळण्यासाठी विभागातील इलेक्ट्रीक व्यवस्था, अग्निशमन उपकरणं आदींसह पर्यायी व्यवस्थेची तपासणी करावी अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading