महापालिकेच्या वॉटरफ्रंट प्रकल्पामधील बाधितांवर अन्याय होऊ न देण्याची पालिका आयुक्तांची ग्वाही

ठाणे महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणा-या वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत बाधित होणा-या कोलशेत, बाळकूम, मोघरपाडा आणि पारसिक रेतीबंदर येथील ग्रामस्थांशी महापालिका आयुक्तांनी थेट संवाद साधून त्यांच्यावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली. त्याचप्रमाणे याठिकाणी निर्माण होणा-या रोजगाराच्या संधीबाबत स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल असं स्पष्ट केलं. काल दिवसभर चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत पालिका आयुक्तांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. सर्वच ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी स्वत:चं फेडरेशन बनवून व्यावहारिक पर्याय सादर केल्यास प्रशासन त्यावर सकारात्मक निर्णय घेईल आणि स्थानिकांवर कुठलाही अन्याय होणार नाही याची दक्षात घेईल असं सांगितलं. वॉटरफ्रंट मध्ये बाधित होणा-या जागेच्या बदल्यात त्यांना टीडीआर स्वरूपात मोबदला दिला जाईल असंही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं. मोघरपाडा येथील ग्रामस्थांशी बोलताना मालक, कब्जेदार आणि कूळ यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. तसंच त्वरीत कॅम्प लावून सर्व कागदपत्रं पूर्ण करून घेण्याची कार्यवाही करण्यात येईल असंही स्पष्ट केलं. कोलशेत ग्रामस्थांनी या ठिकाणी जोडधंदा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली त्यावर बोलताना त्यांनी स्थानिक ग्रामस्थांनी व्यावहारिक तोडगा दिल्यास त्यावर निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं. पारसिक रेतीबंदर येथील ग्रामस्थांशी बोलताना फक्त दीड किलोमीटरच्या पट्ट्यात हा प्रकल्प साकारला जाणार असून उरलेली जागा कायदेशीर प्रक्रियेद्वारे संबंधितांना परत देण्यासंबंधी कार्यवाही करण्यात येईल असं सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading