महापालिकेच्या जलवाहिन्या टाकणा-या कंत्राटदारानं जुन्या जलवाहिन्या टाकून महापालिकेची कोट्यावधीची फसवणूक केल्याचा विरोधी पक्षनेत्यांचा आरोप

ठाणे महापालिकेच्या जलवाहिन्या टाकणा-या कंत्राटदारानं जुन्या जलवाहिन्या टाकून महापालिकेची फसवणूक केल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी उघडकीस आणला आहे. कल्याण फाटा ते दिवा प्रभाग समिती आणि मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत जुन्या जलवाहिन्या टाकून एमकेई इन्फ्रा आणि जस्मीन कंस्ट्रक्शन या कंपन्यांनी महापालिकेकडून 8 कोटी रुपये उकळलेही आहेत. विशेष म्हणजे, याच कंपन्यांना ठाणे शहरात अन्य ठिकाणी सुमारे 200 कोटी रुपयांची कामेही दिली असल्याचा भंडाफोड शानू पठाण यांनी केला आहे. हे काम एमकेई इन्फ्रा आणि जस्मीन कंस्ट्रक्शन या दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. या कंपन्यांनी दुय्यम दर्जाचे साहित्य वापरले असल्याची माहिती विरोधी पक्षनेते शानू पठाण यांना मिळाली होती. त्यानुसार, शानू पठाण यांनी कल्याण फाटा येथे जाऊन पाहणी केली. या पाहणीमध्ये हे पाईप्स जुने असल्याचे निदर्शनास आले. या पाईप्सवर 2010 साल नोंदविण्यात आले असल्याचे दिसून आले आहे. अवघ्या 30 रुपये किलोने हे पाईप खरेदी करुन ठेकेदाराने ठामपाला गंडा घातला आहे. विशेष म्हणजे, पालिकेच्या अधिकार्‍यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या प्रकारात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शानू पठाण यांनी केला आहे. या संदर्भात पठाण यांनी सांगितले की, ठाणेकरांच्या पैशांची कशा पद्धतीने लूटमार केली जात आहे.हे या प्रकारातून उघडकीस आले आहे. ठेकेदार आणि काही अधिकार्‍यांच्या साटेलोट्यांमुळे ही लूट सुरु आहे. ठाणेकरांचा पैसा कसा वाया घालवला जात आहे, याचे हे उदाहरण आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी झालीच पाहिजे. आता ठेकेदाराकडून या जलवाहिन्या बुजविण्यात येणार आहेत. जर, या जलवाहिन्या बुजवण्यात आल्या तर पुरावेही नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका आयुक्त आणि महापौरांनी तत्काळ याची पाहणी करुन संबधित अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी; एमकेई इन्फ्रा आणि जस्मीन कंस्ट्रक्शन या कंपन्यांना ठाणे शहरात देण्यात आलेल्या 200 कोटींच्या कामांची तत्काळ चौकशी करुन त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading