दिवा येथील डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न कायमस्वरुपी सुटला – भंडार्ली येथील जागेवर आता कच-याची विल्हेवाट लावली जाणार

दिवा येथील डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न कायमस्वरुपी सुटला असून कचरा विल्हेवाटीसाठी भंडार्ली येथील जागा महापालिकेने ताब्यात घेतली आहे. जागा ताबा करारनाम्यावर महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यामुळे आता दिवावासियांची डंपिंगच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने ताब्यात आलेल्या भंडार्ली येथील जागेवर लवकरच शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा विघटन प्रकल्प सुरू होणार असल्याचे महापौर आणि आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. शहरातील दैनंदिन बहुतांश कचरा हा दिवा येथील डंपिंग ग्राऊंडवर टाकला जात होता. कचऱ्याची ही समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत होती. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कचऱ्याची विल्हेवाट लावता यावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जागेची पाहणी करण्याचे काम सुरू होते. अखेर मौजे भंडार्ली येथील अंदाजे 10 एकर जागा भाडेतत्वावर महापालिकेने ताब्यात घेतली. दिवावासियांनी गेल्या अनेक वर्षापासून शहराची गैरसोय होवू नये यासाठी शहराचा कचरा दिवा येथील डंपिंग ग्राऊंडवर टाकण्याची परवानगी दिली होती. वाढत्या लोकसंख्येबरोबर शहरातील वाढणारा कचऱ्यामुळे दिवावासियांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. मात्र भंडार्ली येथे जागा उपलब्ध झाल्यामुळे दिवावासियांची डंपिंग्र गाऊंड समस्येतून मुक्तता होणार आहे.भंडार्ली येथील जागा नागरी वस्तीपासून दूर असल्यामुळे तसेच येथे येणाऱ्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन होणार असल्यामुळे नागरिकांना याचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी महापालिका घेणार आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी विरोधाला विरोध न करता या प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे. महापालिकेच्या या स्वत:च्या जागेवर लवकरच कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबतचे काम येत्या दोन आठवड्यात पूर्ण होणार आहे, तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या शासनस्तरावरील सर्व परवानग्या मिळण्याकामी पूर्तता केली असून त्यास मंजूरी मिळेल आणि लवकरच हा प्रकल्प सुरू होईल असा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading