मतदार आहे का हे मी कधीच पाहत नाही – श्रीकांत शिंदे

माझ्याकडे मदत मागण्यासाठी आलेली व्यक्ती ही माझा मतदार आहे का हे मी कधीच पाहत नाही, आपल्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत सर्वांना केली जाते. माझ्या कामातून बाळासाहेबांची, दिघे साहेबांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या खोणी – शिरढोण येथील म्हाडा वसाहतीमधील दोन हजार नागरिकांचा घराचा शेवटचा हप्ता माफ करण्यात आला होता. यामुळे त्यांचें ३२ कोटी रुपये वाचले होते. यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हाडा तसेच राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्याबद्दल खोणी म्हाडा रहिवासी संघटना आणि शिरढोण म्हाडा रहिवासी संघ यांच्या वतीने खासदार शिंदे यांचा विशेष समारंभात सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देत रहिवाशांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले. या सत्कार समारंभात काही रहिवाशांना प्रतिनिधिक स्वरूपात घराच्या चाव्या तसेच काही रकमेचा धनादेशही देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. म्हाडामार्फत नागरिकांना किफायतशीर दरात घरे दिली जातात. याच योजेतून कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोण तालुक्यात परवडणाऱ्या दरातील घरे उभारण्यात आली होती. या घरांसाठीची २०१८ मध्ये सोडत काढण्यात आली होती. त्यात २०२१ पर्यंत विजेत्यांना घराचा ताबा देणे अपेक्षित होते. मात्र या दरम्यान आलेला करोनामुळे ही प्रक्रिया धीम्या गतीने राबविली गेली. त्यामुळे लाभार्थ्यांना घरांचा ताबा वेळेत मिळाला नाही. ताबा न मिळालेल्या घरांचा हप्ता तर दुसरीकडे ज्या घरात भाड्याने राहतो त्या घराचे भाडे अशा दुहेरी आर्थिक कोंडीमध्ये हे लाभार्थी अडकले होते. या आर्थिक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी रहिवाशांनी खासदार शिंदे यांची भेट घेतली होती. खासदार शिंदे यांनी रहिवाशांच्या मागणीनुसार घराचा शेवटचा हप्ता माफ करण्यात यावा अशी विनंती म्हाडा प्रशासनाला केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कोकण गृहनिर्माण मंडळातर्फे काही महिन्यांपूर्वी नागरिकांच्या घराचा शेवटचा हप्ता माफ करण्यात आला होता.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading