मंदिरात प्रवेश करण्यापासून एका दलित तरुणाला रोखल्याप्रकरणी अटक न झाल्याच्या निषेधार्थ उपोषण

मुंब्रा येथील शंकर मंदिरात प्रवेश करण्यापासून एका दलित तरुणाला रोखल्याप्रकरणी भाजपच्या महिला नेत्या रिदा रशीद यांना अटक न झाल्याच्या निषेधार्थ बौद्ध उपासक -उपासिका समन्वय समितीचे उपाध्यक्ष प्रवीण पवार यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. 26 ऑक्टोबर रोजी मुंब्रा येथील सम्राट नगर येथे राहणारे शिवा जगताप हे मुंब्रेश्वर मंदिर येथील तलावाचे बांधकाम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भाजपच्या नेत्या रिदा रशीद, सिंकदर खान आणि त्यांच्या सहकार्‍यांनी शिवा जगताप यांना मंदिर परिसरात येण्यापासून मज्जाव केला होता. तसेच 13 नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमात शिवा जगताप यांना जातीवाचक शिविगाळ केली होती. याप्रकरणी शिवा जगताप यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन मुंबरा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 च्या कलम 3 (1) आर, 3 (1) वाय, 3 (1) (झेडए) सी अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी रिदा रशीद यांना नोटीस बजावली आहे. मात्र नोटीस बजावून तीन दिवस उलटल्यानंतरही अटक करण्यात आली नाही. या निषेधार्थ दलित कार्यकर्ते प्रवीण पवार हे उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असून अद्यापही पोलिस यंत्रणेने त्यांचे उपोषण गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप करीत आपण हे उपोषण रिदा रशीद यांच्या अटकेपर्यंत सुरुच ठेवणार असल्याचा इशारा प्रवीण पवार यांनी दिला. या संदर्भात अ‍ॅड. उत्तेकर आणि अ‍ॅड. म्हस्के यांनी मुंब्रा पोलिसांची भेट घेऊन या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी; अन्यथा या प्रकरणी तपास स्थलांतरीत करण्याबाबत आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करु असा इशारा दिला.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading