भारतीय जनता पक्षातर्फे वीज बिल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

राज्यातील वीज बिलांची दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज जोरदार आंदोलन करण्यात आले. आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच शहराच्या विविध भागात कार्यकर्ते आणि नागरिकांनी आंदोलनाद्वारे वीज बिलांविरोधात जनक्षोभ व्यक्त केला. तसेच राज्य सरकारकडे संताप व्यक्त केला. ठाणे शहरात महावितरण कंपनी आणि कळवा, मुंब्रा, शिळ परिसरात टोरेंट पॉवर कंपनीकडून वीजपुरवठा केला जातो. परंतु लॉकडाऊनच्या काळातच महावितरण कंपनी व टोरेंटने १ एप्रिलपासून स्थिर आकार, वहन आकार आणि वीज आकारामध्ये दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला. जूनमध्ये अचानक किमान दोन हजार ते ५० हजारांपर्यंत बिले ग्राहकांपर्यंत धाडण्यात आली. तर व्यापारी आणि उद्योग क्षेत्राबरोबरच शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र त्यांनाही सरासरी बिले आकारल्यामुळे महावितरण आणि टोरेंट पॉवरचा तुघलकी कारभार उघड झाल्याची टीका डावखरे यांनी केली. या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. वीज बिलांची दरवाढ यंदा स्थगित करावी, दुकाने, कंपनी आणि शाळा-महाविद्यालये बंद असल्यामुळे सरासरी बिलांऐवजी प्रत्यक्ष मीटर रिडिंगनुसार बिले आकारावीत, दुकाने बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांना वीज बिलमाफी द्यावी, वीजबिलांचा भरणा करण्यासाठी लॉकडाऊन संपूर्ण उठल्यानंतर किमान सहा महिन्यांची मुदत द्यावी, वीजबिल थकलेल्या कोणत्याही ग्राहकाचा वर्षभरासाठी वीजपुरवठा खंडित करू नये, थकीत वीजबिलांवर व्याज आकारणी रद्द करावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading