बोगस पदवी सादर करून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालेल्या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा

ठाण्यातील कोलशेत, आझादनगर येथील एका शासनमान्य हिंदी माध्यमाच्या शाळेत मुंबई विद्यापीठाची बीए, बीएड अशी बोगस पदवी धारण करून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालेल्या कल्लुराम जैसवार यांच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात शासनाची आणि संस्थेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. आझादनगर येथे हरेकृष्ण एज्युकेशन सोसायटी या संस्थेद्वारे नव बालविद्यामंदिर हिंदी शाळा चालवली जाते. या संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीचंद आहुजा यांनी याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नव बाल विद्यामंदिर ही शाळा पूर्वी बौद्धविहार सार्वजनिक कमिटी आझादनगर या संस्थेमार्फत चालवली जात होती. तेव्हापासून जैसवार हे या शाळेत मुख्याध्यापक पदी कार्यरत होते. ही कमिटी सक्षम नसल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी 1987 साली मुंबईच्या हरेकृष्ण संस्थेला शाळा चालवण्यास दिली. या संस्थेनेही जैसवार यांनाच मुख्याध्यापक पदी कायम ठेवत शाळेला इयत्ता सातवीपर्यंत शासनाची आणि ठाणे महापालिकेची मान्यता मिळवून दिली. त्यानुसार शाळेला शासकीय अनुदान प्राप्त झाले. मे 2013 रोजी जैसवार निवृत्त होणार असल्याने संस्थेने 2011 रोजी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जैसवार यांच्याकडे पदवीची प्रमाणपत्रे मागितली. तेव्हा जैसवार यांनी मूळ प्रमाणपत्रे शिक्षण विभागाकडे जमा असल्याचे सांगून झेरॉक्स प्रति सादर केल्या. या पदव्यांची छाननी मुंबई विद्यापीठाकडे केली असता दोन्ही पदव्या बोगस आणि बनावट असल्याचा निर्वाळा विद्यापीठाने दिला. त्यानुसार शासनाची आणि संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी जैसवार यांच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading