बाळामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

भिवंडी लोकसभा मतदारसंघात बंडखोरी करणा-या बाळामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती असून युतीच्या जागा वाटपात भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा भारतीय जनता पक्षाकडे गेली आहे. मात्र बाळामामा आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कपिल पाटील यांच्यामधून विस्तव जात नाही. बाळामामा हे शिवसेनेचे ठाणे ग्रामीणचे संपर्क प्रमुख होते. कपिल पाटील यांनी शिवसेनेच्या विरोधात काम केलं म्हणून बाळामामांचा कपिल पाटलांना तीव्र विरोध होता. शिवसेनेच्या नेत्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न करूनही बाळामामा यांनी त्याला धूप घातली नाही आणि अगदी अखेरच्या क्षणी त्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी म्हणूनही प्रयत्न केले होते. काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांना उमेदवारी द्यावी म्हणून मागणीही केली होती. पण त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही. भिवंडी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवारच नाही त्यामुळं आपली उमेदवारी बंडखोरी होऊ शकत नाही. मात्र पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य असून आपण कपिल पाटलांच्या पराभवासाठी काम करू अशा भावना बाळामामा यांनी व्यक्त केल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading