बाळकूम येथील प्रसुती केंद्रात बाळ दगावण्याची घटना

डॉक्टर आणि नर्सच्या हलगर्जीपणामुळे बाळकूम येथील पालिकेच्या आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी दाखल केलेल्या गर्भवतीचे बाळ दगावण्याची घटना घडली आहे. बाळाच्या मृत्यूला आरोग्य केंद्रातील कर्मचारी जबाबदार असल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांनी केली आहे. बाळकूम परिसरात महापालिकेचे आरोग्य केंद्र आहे. या केंद्रात कविता चव्हाण या गर्भवती महिलेनं प्रसुतीसाठी नोंदणी केली होती. तिला प्रसवकळा येऊ लागल्या असतानाही रूग्णालयानं दोनवेळा घरी पाठवलं. १९ जून रोजी पुन्हा कळा अनावर झाल्यानं दाखल होण्यास आलेल्या कविताला प्रसुतीसाठी दाखल करून घेण्यात आलं मात्र तिच्याकडे कुणीच लक्ष देत नव्हतं. तिच्यानंतर आलेल्या दोन महिलांची प्रसुती डॉक्टर आणि नर्सनी केली. मध्यरात्री कविताला कळा असह्य होऊन वेदनेनं ती व्याकूळ झाली होती. मात्र तिचा आवाज ऐकूनही कोणी आले नाही. शेवटी कविता खाटेवरून उठली आणि ती उभी राहत असतानाच प्रसुती होऊन तिचा गर्भ पडल्यानं बाळ दगावले. शेजारी असलेल्या रूग्णानं ओरडून नर्सला बोलावले तोपर्यंत बाळ दगावले होते. ती ओरडत असताना तिच्याकडे लक्ष दिले असते तर बाळ दगावले नसते अशी प्रतिक्रिया कविताच्या नातेवाईकांना व्यक्त करून आरोग्य केंद्रातील संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवसेना नगरसेवक संजय भोईर यांनी हा विषय सर्वसाधारण सभेत उपस्थित केला त्यावेळी प्रशासनानं चौकशी करण्याचे आदेश देऊन या प्रकरणावर पडदा टाकला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading