बनावट पदवी-पदविका प्रमाणपत्र देणा-या ६ जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश

शासनाची मान्यता नसताना स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड इंजिनिअरिंग संस्था स्थापन करून अनेक विद्यार्थ्यांना बनावट पदवी प्रमाणपत्र देणा-या एका सहा जणांच्या टोळीला गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे. काल एका पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी ही माहिती दिली. या टोळीमध्ये ५ महिलांचा समावेश असून नागपूरमधील विविध कार्यालयात छापे मारून तब्बल १२०० पदवी आणि पदविका प्रमाणपत्रं हस्तगत करण्यात आल्याचं देवराज यांनी सांगितलं. इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड इंजिनिअरिंग संस्थेचं मुख्य कार्यालय नागपूरमध्ये आहे. पदवी आणि पदविका मिळवण्यासाठी संस्थेकडील अल्प मुदतीच्या पदविका अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी हे भामटे डोंबिवलीतील एका हॉटेलात आले होते. पोलीसांनी गुन्हे शाखेतील महिला कर्मचारी निलम पाचपुते यांना विद्यार्थी बनवून हॉटेलमध्ये पाठवले. त्यानंतर प्रिती घाटोळ या महिलेला पोलीसांनी ताब्यात घेतले. तीनं दिलेल्या माहितीनुसार नागपूरमधील संस्थेच्या विविध कार्यालयांवर एकावेळी छापे टाकून १२०० विविध प्रमाणपत्रं हस्तगत करण्यात आल्याचं देवराज यांनी सांगितलं. या संस्थेचा संचालक महम्मद अन्सारी याच्यासह ५ महिलांना अटक करण्यात आली आहे. या बनावट प्रमाणपत्र रॅकेटमध्ये आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता असून विविध शासकीय तसंच खाजगी आस्थापनांमधील या संस्थेची प्रमाणपत्रं धारण करणा-यांचा पोलीस शोध घेत आहेत. या संस्थेचे प्रचारक विद्यार्थ्यांना समजावून हवी असलेली पदवी किंवा पदविका अवघ्या ६० हजार ते १ लाख रूपयांच्या बदल्यात देत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading