प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत चार शहरात ठाण्याची निवड

प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. ठाण्यात या योजनेचे चांगले काम झाले आहे. अर्थात, केवळ उद्दिष्ट पूर्तता हे लक्ष्य न ठेवता बचत गट, पथ विक्रेते यांच्या समस्या सोडविण्यावर आता पालिकेच्या समाज विकास विभागाने लक्ष द्यावे, अशी सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘स्वनिधी महोत्सव’ कार्यक्रमात केली. आता योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी ‘स्वनिधी महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. त्यासाठी निवडलेल्या चार शहरांपैकी ठाणे हे एक शहर आहे, ही आनंदाची बाब असल्याचे बांगर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पथ विक्रेत्या लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आले. त्यात ठाणे शहरातील पथ विक्रेत्यांचा मोठा सहभाग होता. सुमारे २० हजार पथ विक्रेते याचे लाभार्थी असून त्यापैकी ५५ टक्के महिला आहेत. कर्ज परतफेडीचे प्रमाण ही चांगले आहे. या योजनेसाठी स्टेट बँक, महाराष्ट्र बँक आणि कॅनरा बँक यांनी उत्तम केले. इतर बँकांनी असाच सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयुक्त बांगर यांनी केले. बचत गट आणि त्यांचे फेडरेशन, पथ विक्रेते आणि त्यांच्या संघटना यांच्याशी संवाद वाढवावा. दिवस आणि वेळ निश्चित करून त्यांच्या प्रतिनिधींना भेटावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. बचत गटास पॅकेजिंग, ग्रेडिंग, ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग यांच्यासाठी आवश्यक ती मदत केली जावी, तसेच पथ विक्रेत्यांच्या गाळे वाटपाबाबत लोकप्रतिनिधी, संघटना यांच्याशी चर्चा करून लवकरच मार्ग काढला जाईल, असेही आयुक्तांनी सांगितलं. कार्यक्रमापूर्वी आमदार निरंजन डावखरे आणि महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महोत्सवात सहभागी झालेल्या बचत गटांच्या स्टॉलला भेट दिली. त्यांच्या वस्तू, उत्पादने यांची माहिती घेतली. तसेच त्यांच्याशी संवाद साधला. स्वनिधी महोत्सवात एनयूएलएमचे राष्ट्रीय अभियान व्यवस्थापक जीवनज्योती मोहंती यांनी महाराष्ट्राचे कौतुक केले. महाराष्ट्राने प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेत देशात चौथ्या क्रमांकाची कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले.
डिजिटल आर्थिक देवाण-घेवाण करणारे पथ विक्रेते, एनयूएलएम योजनेतील वैयक्तिक कर्ज लाभार्थी, बँक अधिकारी यांचा महोत्सवात प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. स्वनिधी से समृद्धी कार्यक्रमांतर्गत श्रमयोगी कार्ड वाटप करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading