पोलीस वसाहतीचा प्रश्न अवघ्या एका बैठकीत निकाली

वर्तकनगर पोलीस वसाहतीचा प्रश्न म्हाडाच्या माध्यमातून येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत केली. गेली 9 वर्षे तीन सरकारांकडे पाठपुरावा केल्यानंतर आव्हाड यांच्याकडे गेलेला हा प्रश्न त्यांनी अवघ्या पहिल्याच बैठकीत मार्गी लावला. आव्हाडामुळेच पोलीस कुटुंबियांना न्याय मिळाला, याचा आपणाला अभिमान आहे, असे गौरवोद्घार ओवळा-माजीवड्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी काढले.
गेली अनेक वर्षे रखडलेला वर्तक नगर येथील पोलीस वसाहतीच्या पुन:र्वसनाचा प्रश्न आव्हाड यांनी अवघ्या एकाच बैठकीत निकाली काढला आहे. या संदर्भातील माहिती देण्यासाठी बोलावल्या पत्रकार परिषदेत आव्हाड आणि सरनाईक बोलत होते. गेली अनेक वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून सरनाईक वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या पुन:र्विकासासाठी पाठपुरावा करीत होते. त्यांनी आपल्याशी चर्चा केल्यानंतर आपण हा प्रश्न धसास लावल्याचं आव्हाड यांनी यावेळी बोलताना सांगितलं. योगायोगाने या खात्याचा मंत्री असल्याने त्यांच्या या पाठपुराव्याला पूर्णविराम लावणे आपल्याला शक्य झाले. हा पुन:र्विकास कोणी करावा, या मुद्यावर अनेकांचा विरोध होता. मात्र हा विरोध झुगारुन भूखंड म्हाडाचा असल्याने म्हाडाच्या वतीनेच पुन:र्विकास करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार 567 घरे ही पोलिसांना देण्यात येणार असून उर्वरित घरांपैकी आणखी 10 टक्के घरे पोलिसांसाठीच राखीव ठेवण्यात येणार आहेत. तसेच अन्य 10 टक्के घरे ही शासकीय कर्मचार्‍यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
यावेळी सरनाईक यांनी गेल्या 9 वर्षांपासून वर्तकनगरमधील पोलीस वसाहतीच्या पुन:र्विकासासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. इमारती धोकादायक झाल्यामुळे येथील अनेक कुटुंबांचे रेंटल हाऊसिंगमध्ये स्थलांतर करण्यात आलं आहे. फडणवीस सरकारच्या काळातही आश्वासने देण्यात आली होती. मात्र आव्हाड यांच्याशी महिन्याभरापूर्वी पत्रव्यवहार केला. त्यांनीही म्हाडा आणि गृहखात्याची संयुक्त बैठक बोलावून हा प्रश्न तत्काळ मार्गी लावला. एकाच बैठकीमध्ये त्यांनी येथील पुन:र्विकासाला मान्यता दिली. या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांसाठी गेस्ट हाऊस, हॉल, क्लब हाऊस आदींची व्यवस्था करावी अशी सूचना केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading