पालिकेची दुकानदारांवर कारवाई; तर फेरीवाल्यांना `पायघड्या’

कोरोना निर्बंध लागू केल्यानंतर शनिवारी-रविवारबरोबरच सायंकाळी ४ नंतर दुकाने उघडी ठेवणाऱ्या नौपाड्यातील दुकानदारांवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. तर बेकायदा फेरीवाल्यांसाठी अतिक्रमण विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून `पायघड्या’ टाकल्या जात आहेत, असा आरोप नगरसेवक संजय वाघुले यांनी केला आहे. नौपाड्यात बिनदिक्कतपणे फेरीवाल्यांकडून पदपथांवर पथारी मांडली जाते. तर ना-फेरीवाला क्षेत्रातही घुसखोरी केली जात आहे याकडे वाघुले यांनी लक्ष वेधले आहे.महापालिकेकडून दुकानदारांवर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार शनिवारी-रविवारी दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यासाठी पालिकेचे पथक सातत्याने नौपाडा परिसरात गस्त घालते. मात्र, त्याचवेळी पदपथावर दुकाने थाटणाऱ्या फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. इतकेच नव्हे तर रेल्वे स्थानकापासून १५० मीटर क्षेत्रात ना-फेरीवाला क्षेत्र आहे. मात्र, त्यातही फेरीवाल्यांकडून घुसखोरी केली जाते. या प्रकाराविरोधात वाघुले यांनी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त, नौपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. काही वेळा थातुरमातूर कारवाई केली जाते. मात्र, जुजबी दंड आकारून फेरीवाल्यांना पुन्हा सामान दिले जाते. ते सामान घेऊनच पुन्हा फेरीवाले त्याच ठिकाणी पथारी पसरतात. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आर्थिक हितसंबंधांमुळे कठोर कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असावे, असा आरोप संजय वाघुले यांनी केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading