पार्किंग प्लाझा गैरव्यवहार प्रकरणी कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची संजय वाघुलेंची मागणी

पोखरण रोड क्रमांक दोन येथील पार्किंग प्लाझा गैरव्यवहारप्रकरणी संबंधित
कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच महापालिकेच्या ठरावाची
अंमलबजावणी न करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,
अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.
आशर रेसिडेन्सी ही इमारत उभारताना विकसकाने सुविधा भूखंडावर उभारलेल्या
पार्किंग प्लाझाचे महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आले. त्यानंतर महापालिकेने
ऑगस्ट २०११ मध्ये प्लाझाचे काम मे. ऑटो फॅब कंपनीकडे सहा महिन्यांसाठी
सोपविले होते. त्याबदल्यात महापालिकेला दरमहा १४ हजार ५०० रुपये दिले जात
होते. या कामासाठी निविदा काढल्यानंतर एका कंपनीने सर्वाधिक ७२ हजार
रुपयांची बोली लावली. या संदर्भात १२ ऑगस्ट २०१३ रोजी महासभेत ठरावही
मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्याची आठ वर्षानंतरही अंमलबजावणी झालेली
नाही. गेल्या वर्षी २२ जुलैपर्यंत हा प्लाझा जुन्या कंत्राटदाराच्या ताब्यात होता.
त्यातील एक मजला अजूनही कंत्राटदाराकडून वापरला जात आहे. या काळात
पहिल्या पाच वर्षात ३२ लाख ७७ हजार रुपये व त्यापुढील तीन वर्षातील २० लाख
असा ५२ लाखांचा महसूल कंत्राटदाराने बुडविला आहे. या पैशाची
महापालिकेकडून वसुलीही केली जात नाही, याकडे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक
संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा व अतिरिक्त आयुक्त
संजय हेरवाडे यांचे लक्ष वेधले.
या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा.
तसेच त्याला काळ्या यादीत टाकून थकीत भाडे वसूल करावे. त्याचबरोबरच
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी न
करता जुन्या दराने कंत्राट कायम ठेवणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी
करावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading