पाचपाखाडीतील साईनाथ नगर गृहनिर्माण संस्थेतील कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार

क्लस्टर प्रकल्पाची चर्चा सुरू असतानाच, पाचपाखाडीत तब्बल ३० ते ३५ वर्षांपासून घरांच्या प्रतिक्षेत असलेल्या साईनाथ नगर गृहनिर्माण संस्थेतील २८२ हून अधिक कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नगरसेवक नारायण पवार यांनी बिल्डर, महापालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे सातत्याने प्रयत्न करीत तांत्रिक अडथळे दूर केल्यामुळे या कुटुंबांना हक्काचा निवारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. नितीन कंपनी जंक्शन लगत खासगी मालकीच्या भूखंड क्रमांक ३२५ वर साईनाथ नगर गृहनिर्माण संस्था वसली आहे. या झोपडपट्टीलगत सुमारे ३५ वर्षांपूर्वी आलिशान गृहसंकूल उभारले गेले. त्यावेळी या झोपडपट्टीचाही विकास करण्याचा प्रयत्न होता. मात्र, तांत्रिक अडचणी आणि बिल्डरच्या अनास्थेमुळे विकास रखडला. त्यानंतर येथील रहिवाशांच्या तीन समित्या स्थापन झाल्या होत्या. त्यांच्याकडून सरकारी यंत्रणांकडे पाठपुरावा केला जात होता. दिग्गज नेत्यांकडे गाऱ्हाणे मांडण्यात आले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. पुनर्विकासासाठी भूखंड छोटा असल्याचे कारण सांगण्यात येत होते. मात्र, रहिवाशांनी चिकाटी सोडली नाही. अखेर या प्रश्नावर काही रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक नारायण पवार यांना साकडे घातले. या झोपडपट्टीच्या विकास प्रस्तावाचा पवार यांच्याकडून अभ्यास करण्यात आला. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून २०१३ पासून एसआरएकडे पत्रव्यवहार करण्यात आला. संबंधित भूखंडावर बिल्डरचे नाव होते. मात्र, सर्व प्रक्रिया पूर्ण करून घरांना झोपडपट्टी म्हणून जाहीर करण्यात आले. एका बिल्डरच्या वारसाने विकास करण्यास परवानगी नाकारली. तर त्यांच्या भागीदारांची समजूत काढण्यासाठी नारायण पवार गुजरातेतील भूजमध्ये गेले होते. या प्रकरणाची एसआरएचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी दीपक कपूर यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यावेळी मुलांचे दाखले, शाळेतील मुलांच्या निवासस्थानाचा पत्ता दाखविण्यात आले. अखेर श्री साईनाथ सोसायटीचा दावा मान्य केल्यामुळे प्रॉपर्टी कार्डवर सोसायटीचे नाव आले. त्यामुळे रहिवाशांनी आता मोकळा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी सोसायटीची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत प्रत्येक कुटुंबाला ३०० चौरस फुटांचे घर, घरभाड्याने घेण्यासाठी ५० हजार रुपये डिपॉझीट आणि मासिक घरभाडे १० हजार रुपये देण्याचा निर्णय बिल्डरने घेतला आहे. या प्रस्तावाला बहुसंख्य रहिवाशांनी संमती दिली आहे. त्यामुळे तब्बल ३५ वर्षांपासूनचे घरांचे स्वप्न साकार होणार आहे अशी माहिती साईनाथ सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र गोळे यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading